Prakash Raj on CM Joseph Vijay Government: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अभिनेता आणि विद्यमान मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यावर सातत्याने तोफ डागणारे ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांनी आता विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबत मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून विजय यांच्या सरकारला १२० दिवस नुकतेच पूर्ण झाले. त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी ही वेळ फार घाईची आहे, असे मत प्रकाश राज यांनी व्यक्त केले. विजय यांच्या सरकारला किमान एक वर्षाचा अवधी दिला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
तिरुचिरापल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश राज म्हणाले, “विजय हे केवळ त्यांना मतदान करणाऱ्यांचेच मुख्यमंत्री नसून, ज्यांनी मतदान केलेले नाही त्यांचेही मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. त्यांच्या सरकारच्या कामगिरीवर लगेच भाष्य करण्याऐवजी किमान एका वर्षाचा वेळ देणे गरजेचे आहे.”
‘आता लगेच निष्कर्षाप्रत येणे चुकीचे’
राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध आंदोलनांवर भाष्य करताना प्रकाश राज म्हणाले की, सत्ताधारी कोणताही असो, लोकांनी आपल्या मागण्या मांडणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग असून आंदोलनांकडे त्याच व्यापक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.
प्रकाश राज पुढे म्हणाले, “माझ्या मनात विजयबद्दल आजही अनेक शंका आहेत. निवडणुकीआधीही मी त्या उघडपणे मांडल्या होत्या. परंतु आता त्यांच्या पक्षाने (टीव्हीके) विजय मिळवून सरकार स्थापन केले आहे. सरकार येऊन अवघे १२० दिवस झाले आहेत, त्यामुळे आत्ताच निष्कर्षाप्रत येता येणार नाही. आपल्याला त्यांना पुरेसा वेळ द्यावा लागेल. एका वर्षानंतरही त्यांनी अपेक्षेप्रमाणे काम केले नाही, तर मी नक्कीच प्रश्न उपस्थित करेन.”
“मी सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जाईपर्यंत थांबणार आहे. आताच त्यांच्यावर टीका करण्याची घाई करण्याची गरज नाही. सत्तेत असणारी व्यक्ती आपल्याला आवडत नाही म्हणून लगेच टीका करणे योग्य नाही. आपण लोकशाही आणि जनतेच्या मताचा आदर केला पाहिजे,” असेही प्रकाश राज यावेळी म्हणाले.
विजय-अजित भेटीचे केले समर्थन
मुख्यमंत्री विजय यांच्या नुकत्याच झालेल्या विदेश दौऱ्यादरम्यान ब्रिटनमधील सिल्व्हरस्टोन येथे ‘मिशेलिन ले मान्स कप’ शर्यतीवेळी त्यांची अभिनेता अजित कुमारशी भेट झाली. या भेटीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश राज यांनी या भेटीत काहीही गैर नसल्याचे स्पष्ट केले. “तो कोणत्या उद्देशाने तिथे गेला होता आणि ते उद्दिष्ट साध्य झाले का, हे मी पाहीन. हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आणल्याचा दावा त्यांनी केला आहे, ते अधिक महत्त्वाचे आहे,” असे राज म्हणाले.
दरम्यान, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश राज यांनी विजय यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर सडकून टीका केली होती. लोकांनी दाखवलेल्या प्रेमाचा विजय गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. “चित्रपट वेगळा आणि राजकारण वेगळे. तुम्ही लोकांच्या प्रश्नांवर, तमिळ अस्मितेवर कधी लढा दिला आहे का?” असा सवाल त्यांनी एका प्रचारसभेत उपस्थित केला होता.
विजय आणि प्रकाश राज यांनी ‘गिली’ (२००४), ‘पोक्किरी’ (२००७), ‘सिल्वक्कासी’ (२००५), ‘वारिसु’ (२०२३) यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
