Prakash Raj Delhi protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला दिल्लीत वेगळं वळण लागलं आहे. अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना कुठे ठेवण्यात आलंय, याबाबत माहिती समोर आलेली नाही. तसंच, या तिघांच्या गैरहजेरीत कॉक्रोच जनता पार्टीचे नवे प्रमुख अजिंक्य शिंदे आंदोलनाची धुरा सांभाळणार आहेत. दरम्यान, या आंदोलनात अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. अनेक माजी मुख्यमंत्र्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, अभिनेते प्रकाश राज यांनीही पोलिसांच्या आणि सरकारच्या या कारवाईविरोधात आवाज उठवला असून त्यांनी सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अभिनेते प्रकाश राज म्हणाले, “हा काय हंगामा आहे? देशातील तरुणांना विमानातून, त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं जातंय. त्यांना आंदोलनस्थळावर पोहोचू दिलं जात नाहीय. याचा अर्थ तुम्ही घाबरत आहात.
ते पुढे उपोरधिकपणे म्हणाले,पोलीस आणि लष्कराच्यामार्फत तुम्ही आम्हाला ताब्यात घेत नाही आहात, आमचा आवाज दाबत नाही आहात, पण घाबरुन तुम्हीच स्वतःला अटक करत आहात.”
सरकारचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं म्हणत प्रकाश राज म्हणाले, आम्ही देशातील लोकशाही मरू देणार नाही. हा एक दीर्घकाळ चालणारा लढा असून आम्ही प्रश्न विचारणं थांबवणार नाही आहोत.”
प्रकाश राज यांनी व्हिडिओद्वारे सरकारवर रोष व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “तुम्ही कधीपर्यंत नदीला थांबवणार आहात?”
दिल्लीत नेमकं काय घडतंय
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन होऊ नये यासाठी निमलष्करी दलाची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र दलाचे सुमारे २३ हजार जवान आणि दिल्ली पोलिसांचे ५,००० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मध्य दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खिळे लावण्यात आले असून प्रत्येक चौकीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी होत आहे. पोलिसांनी आंदोलकांसह कंटेट क्रिएटर्सनाही ताब्यात घेतले आहे. तसेच यूट्यूबर ध्रुव राठी यालाही गुरुग्राममधील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले. अभिजीत दिपके आणि इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्रातील तरूण अजिंक्य शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे. याबद्दलची घोषणा स्वतः दिपके यांनी आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओतून केली.
