नीट पेपरफुटीचा मुद्दा हा धर्मेंद्र प्रधान यांना चांगलाच भोवला. त्यांच्याविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने ३६ दिवस आंदोलन पुकारलं होतं. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे. आपण जाणून घेऊ प्रल्हाद जोशी यांची राजकीय कारकीर्द कशी आहे आणि त्यांची निवड मोदींनी का केली?
प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द कशी आहे?
प्रल्हाद जोशी यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं आहे.तसंच त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार खातंही आहे. आता त्यांना शिक्षण खात्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. प्रल्हाद जोशी हे भाजपाचे नेते आहेत. एनडीए सरकारमध्ये २०२४ च्या कॅबिनेटमध्ये त्यांना मंत्री म्हणून स्थान देण्यात आलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रल्हाद जोशी यांनी धारवाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विनोद आसुती यांचा ९७ हजारांहून अधिक मतांनी पराभव करत सलग पाचव्यांदा विजय मिळवला. प्रल्हाद जोशी यांनी हुबळी येथील के. एस. कला महाविद्यालय आणि धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळवली आहे. १९९२ ते १९९४ या कालावधीत हुबळी येथील इदगाह मैदानासाठी झालेल्या आंदोलनातून प्रल्हाद जोशी हे पहिल्यांदा चर्चेत आले. २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रल्हाद जोशींकडे भाजपाच्या कर्नाटक राज्य प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. २०२४ मध्ये सलग पाचव्यांदा विजय मिळाल्यानंतर त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद आलं. आता त्यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारीही देण्यात आली आहे.
प्रल्हाद जोशी २००४ पासून राष्ट्रीय राजकारणात
प्रल्हाद जोशी यांचा जन्म नोव्हेंबर १९६२ मध्ये उत्तर कर्नाटकातल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला. २००४ मध्ये प्रल्हाद जोशी हे पहिल्यांदा राष्ट्रीय राजकारणात आले. भाजपात येण्यापूर्वी प्रल्हाद जोशी यांची पार्श्वभूमी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. १९९६ मध्ये ते कर्नाटक विधानसभेत आमदार झाले. त्यानंतर ८ वर्षांनी त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. २००४ ते २०२४ सलग पाचवेळा खासदार होण्याचा रेकॉर्ड प्रल्हाद जोशींच्या नावे आहे. कर्नाटकातल्या प्रमुख भाजपा नेत्यांमध्ये प्रल्हाद जोशींची गणना होते. त्यांनाही टीकेचा सामना करावा लागला आहे. पण राजकीय आव्हानं उत्तम पद्धतीने पेलण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
शिक्षण मंत्रालयासमोर व्यवस्थेतील पारदर्शकतेचं आव्हान
शिक्षण मंत्रालयासमोर सध्या परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, राष्ट्रीय प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP)ची अंमलबजावणी तसेच विविध शैक्षणिक सुधारणा यांसारखी महत्त्वाची आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत प्रल्हाद जोशी यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे शिक्षण मंत्रालयाच्या पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे. याबदला वेळी मंत्रालयाला नवा मंत्री भेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रल्हाद जोशी यांची निवड का करण्यात आली?
प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खातं देण्यात आलं आहे. संसदेत जी वादाची स्थिती निर्माण झाली आहे तिथली परिस्थिती स्थिर करण्याच्या दृष्टीतून याकडे पाहिलं जातं आहे. २०१९ मधअये केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना वाद मिटवणं, त्यावर तोडगा काढणं, सभागृहाचं व्यवस्थापन हे सगळं हाताळण्याचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
