Pranit More Biryani Controversy FIR News: ‘बिग बॉस’ फेम आणि प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या ३७० रुपयांच्या बिर्याणी वादाप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रणित मोरेसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. एका शो दरम्यान महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
नेमका काय आहे वाद?
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणित मोरेच्या एका शोमधील काही व्हिडिओ क्लिप्स यूट्यूब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल झाल्या होत्या. या व्हिडिओमध्ये महिला, त्यांची संमती आणि थेट मृतदेहांचा संदर्भ देत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आल्या होत्या. हा प्रकार सामाजिक संस्कृतीला काळिमा फासणारा आणि कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
‘त्या’ व्हिडिओमध्ये नक्की काय होतं?
याप्रकरणी पोलिस तपासात प्रामुख्याने दोन क्लिप्स समोर आल्या आहेत:
- हिमांशु जांगडाचे वक्तव्य: एका क्लिपमध्ये हिमांशु जांगडा याने ‘डेट’वर मुलीसाठी पैसे खर्च केले म्हणजे तिच्यावर शारीरिक हक्क मिळतो, अशा आशयाचे अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे महिलांचा अवमान तर झालाच, पण ‘स्त्री संमती’च्या संवेदनशील मुद्द्यालाही पायदळी तुडवण्यात आले.
- डॉ. सेजल पवार यांची टिप्पणी: दुसऱ्या एका क्लिपमध्ये डॉ. सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या पुरुषांच्या मृतदेहांबद्दल (Cadavers) अत्यंत बीभत्स आणि अश्लील वक्तव्य केले होते. मृत व्यक्तीच्या आदराला आणि सार्वजनिक नैतिकतेला धक्का लावणारे हे विधान होते.
पैशांच्या हव्यासापोटी अश्लीलतेचा प्रसार?
केवळ व्ह्यूज, लाइक्स आणि सोशल मीडियावरील एंगेजमेंट वाढवून आर्थिक फायदा कमावण्यासाठीच हा आक्षेपार्ह मजकूर रेकॉर्ड आणि प्रमोट करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या कलमांखाली गुन्हा दाखल
याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ (BNS) आणि ‘माहिती तंत्रज्ञान कायदा २०००’ (IT Act) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
- BNS कलमे: ७५(१)(iv), ७५(३), २९४, आणि ३५३(२)
- IT Act कलम: ६७
या गुन्ह्याअंतर्गत प्रणित मोरे, हिमांशु जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांच्यासह या प्रक्रियेत सामील असलेल्या इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीसाठी समन्स जारी
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगवान केला असून प्रणित मोरे, हिमांशु जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. त्यांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांचे कंटेन्ट क्रिएटर्स आणि नागरिकांना आवाहन
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची नियमावली जारी केली आहे:
- क्रिएटर्ससाठी: इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेन्ट क्रिएटर्सनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करताना कायद्याचे भान ठेवावे आणि जबाबदारीने वागावे.
- नागरिकांसाठी: अशा प्रकारचे अश्लील, आक्षेपार्ह या वादग्रस्त व्हिडिओ पुढे फॉरवर्ड किंवा शेअर करू नयेत. असे व्हिडिओ शेअर करणेदेखील कायदेशीर गुन्ह्याच्या कक्षेत येऊ शकते.
डिजिटल जग सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलीस कटिबद्ध असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
