प्रणव मुखर्जींचा उपचारांचा प्रतिसाद, ते लवकरच बरे होतील – अभिजीत मुखर्जी

प्रकृती स्थिर असली तरी अद्याप प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी रविवारी सकाळी ट्विटद्वारे दिली. तसेच प्रकृती स्थिर असली तरी अद्याप प्रणव मुखर्जी यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलने दिली आहे.

८४ वर्षीय माजी राष्ट्रपतींवर १० ऑगस्ट रोजी मेंदू शस्त्रक्रिया झाली होती, यावेळी त्यांच्या मेंदूमधून रक्ताच्या गाठी काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांचा करोनाचा चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा पासून त्यांच्यावर आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी प्रणव मुखर्जी कोमात गेले असल्याचे रुग्णालयाने सांगितले होते.

दरम्यान, मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत हे सातत्याने आपल्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती देत आहेत. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ट्विट करुन त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली. ते म्हणाले, “काल मी वडिलांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छांमुळे त्यांच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाली असून गेल्या काही दिवसांपेक्षा आज स्थिरही आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतचे सर्व महत्वाचे वैद्यकीय मापदंड स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे ते पुन्हा लवकरच आपल्यामध्ये असतील असा मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद.”

अभिजीत यांच्या ट्विट नंतर तासाभरानं रुग्णालयानं मुखर्जी यांच्या प्रकृतीची माहिती देताना सांगितलं की, “माजी राष्ट्रपती हे अनेक जुन्या आजारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना सध्या व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीबाबत तज्ज्ञांच्या पथकाकडून बारकाईने निरिक्षण केले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pranab mukherjee responding to treatment we believe he will be back soon says his son abhijeet mukharji aau

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या