सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज साजरा होत आहे. योग दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी करोना महामारी आणि योग याविषयी भाष्य केलं. “योग दिवस विश्व बंधुत्वाचा संदेश देणारा दिवस असून, जो आपल्याला जोडतो, एकत्र आणतो, तोच तर योग आहे. जो अंतर संपवतो तोच तर योग आहे. योग केल्यानं आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनतं. त्यामुळे प्रत्येकानं व्यायाम करण्याबरोबरच योगालाही आयुष्याचं भाग बनवावं,” असं आवाहन मोदी यांनी केलं.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “करोनाच्या या संकटाच्या काळात जगभरातील लोकांनी माय लाईफ माय योग या स्पर्धेत सहभाग हे दाखवून देतो की, लोकांच्या योगाविषयी उत्साह वाढत आहे. यावर्षी योगाचं ब्रीद घरातच योग, कुटुंबासोबत योग आहे. आज सगळे कुटुंबासोबत योग करत आहे. योगाच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होता. कौटुंबिक बंध वाढवण्याचाही हा दिवस आहे. करोनाच्या संकटामुळे जग योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्यानं घेत आहे”, असं मोदी म्हणाले.

“आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर करोनाला हरवण्यास मदत होते. करोना विशेषतः आपल्या श्वसन संस्थेवर हल्ला करतो. त्यामुळे आपल्या श्वसन संस्थेला सुदृढ करण्यामध्ये सगळ्यात जास्त फायदेशिर ठरतो तो प्राणायाम. म्हणजे श्वसनाचे प्राणायम. एक सजग नागरिक म्हणून आपण कुटुंब व समाजासह एकजुटीनं पुढे जाऊ. घरात योग व कुटुंबीयांसोबत योग करण्यासाठी आपण प्रयत्न करू. योग आपल्याला आयुष्याचा भाग बनवा,” असं मोदी म्हणाले.