Latest News Updates on New FIR Against Pranit More: बिग बॉस फेम स्टॅण्ड-अप कॉमेडियन प्रणित मोरे हा जोरदार चर्चेमध्ये आला आहे. ३७० रुपयांची बिर्याणी आणि त्यावर दिलेली प्रतिक्रिया यांमुळे प्रणित मोरेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणावरून देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असतानाच, आता प्रणित मोरे आणि त्या शोमधील तरुण हिमांशू जांग्रा यांच्याविरोधात गुरुग्राम पोलिसांनी आणखी एक नवीन गुन्हा (FIR) दाखल केला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
महिला आयोगाच्या तक्रारीनंतर गुरुग्राम पोलिसांची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राम पोलिसांनी प्रणित मोरे आणि हिमांशू जांग्रा यांना तपासात सामील होण्यासाठी नोटीस बजावली आहे. तसेच, संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना तो वादग्रस्त व्हिडिओ तातडीने हटवण्याचे आदेशही दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६७ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २९४, ३५३(३), ७५(२) आणि ७५(३) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुग्रामच्या पोलीस आयुक्तांच्या थेट मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
नक्की काय आहे ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’चा वाद?
हा सगळा प्रकारप्रणित मोरे याच्या एका ‘लाइव्ह शो’दरम्यान घडला. शो सुरू असताना प्रणितने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हिमांशू जांग्रा नावाच्या तरुणाशी संवाद साधायला सुरुवात केली. यावेळी हिमांशूने एका मुलीसोबत डेटवर गेल्याचा किस्सा सांगितला. “मी तिच्यासोबत डेटवर गेलो आणि बिर्याणीवर ३७० रुपये खर्च केले,” असे हिमांशू म्हणाला.
पण खरी मेख पुढे होती. हिमांशूने पुढे असे वादग्रस्त विधान केले की, ‘मी तिच्यावर पैसे खर्च केले असल्यामुळे तिने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवलेच पाहिजेत.’
या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “पैसे खर्च केले म्हणजे महिलेच्या संमतीशिवाय तिच्यावर हक्क गाजवता येतो का? हा प्रकार अत्यंत लज्जास्पद असून महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारा आहे,” अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आणि महिला संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला.
महाराष्ट्रातही गुन्हा दाखल
प्रणित मोरेवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी महाराष्ट्र सायबर पोलिसांनीदेखील या प्रकरणी प्रणित मोरे, हिमांशू जांग्रा, डॉ. सेजल पवार आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेची संमती, महिलांचा आदर आणि मृत व्यक्तींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह व अश्लील टिप्पण्या केल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे.
‘माझं चुकलं…’, प्रणित मोरेने मागितली जाहीर माफी
चौफेर टीका आणि पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागल्यानंतर कॉमेडियन प्रणित मोरे याने एक व्हिडिओ जारी करत जाहीर माफी मागितली आहे.प्रणित म्हणाला, “मला हे खूप आधीच सांगायचं होतं, पण माझं इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झालं होतं. माझ्या त्या व्हिडिओमुळे लोकांमध्ये प्रचंड राग आहे आणि मला मिळणारा हा राग अगदी योग्यच आहे, असं मला वाटतं. तो तरुण जेव्हा महिलांबद्दल अत्यंत चुकीच्या गोष्टी बोलत होता, तेव्हा तिथे सगळेच हसत होते. मीही त्या ओघात वाहून गेलो आणि तिथे माझी विवेकबुद्धी चालली नाही.”
तो पुढे म्हणाला, “माझ्याकडून ही खूप मोठी चूक झाली. मी त्याला तिथेच थांबवायला हवं होतं किंवा त्याचा निषेध करायला हवा होता, पण मी तसं केलं नाही. उलट मी त्याला व्यासपीठ मिळवून दिलं, ज्यामुळे हा वाद वाढला. ज्यांच्या भावना यामुळे दुखावल्या आहेत, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो.”
