आजच्या काळात तंत्रज्ञान आणि स्टार्टअपच्या जगात वयाचे बंधन उरलेले नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे एका १६ वर्षीय भारतीय तरुणीने. जिथे या वयात मुले आपल्या शालेय अभ्यासात व्यस्त असतात, तिथे प्रांजली अवस्थी या १६ वर्षांच्या मुलीने तब्बल १०० कोटी रुपयांची ‘AI’ कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप कंपनी उभी करून जगभरात कौतुकाची थाप मिळवली आहे. याबाबतचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिध्द केले आहे.
वयाच्या ७ व्या वर्षापासून कोडिंगचे धडे
प्रांजलीच्या या यशाचा पाया तिच्या घरातच रचला गेला. तिचे वडील स्वतः एक इंजिनिअर आहेत. त्यांच्या मते, इतर विषयांप्रमाणेच संगणक शास्त्र Computer Science देखील शालेय स्तरावर शिकवले गेले पाहिजे. वडिलांच्या याच विचारामुळे प्रांजलीने वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी कोडिंग शिकण्यास सुरुवात केली. पुढे वयाच्या ११ व्या वर्षी जेव्हा तिचे कुटुंब अमेरिकेतील फ्लोरिडा येथे स्थायिक झाले, तेव्हा तिची कॉम्प्युटर सायन्स आणि गणित या विषयांवरील पकड आणखी घट्ट झाली.
कोरोना काळात बदलले नशीब
प्रांजली १३ वर्षांची असताना कोरोना महामारीमुळे तिची शाळा ऑनलाईन झाली. या वेळेचा सदुपयोग करत तिने ‘फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’च्या रिसर्च लॅबमध्ये इंटर्नशिप सुरू केली. तिथे ती आठवड्याला २० तास मशिन लर्निंगच्या प्रोजेक्ट्सवर काम करायची. याच दरम्यान २०२० मध्ये जेव्हा OpenAI ने ChatGPT-3 ची बीटा आवृत्ती लाँच केली, तेव्हा प्रांजलीला एक भन्नाट कल्पना सुचली. रिसर्च करताना डेटा शोधणे आणि त्याचा गोषवारा तयार करणे किती कठीण असते, हे तिने स्वतः अनुभवले होते. हाच प्रश्न सोडवण्यासाठी तिने एका नवीन स्टार्टअपचा विचार केला.
‘Delv.AI’ ची सुरुवात आणि १०० कोटींचे मूल्य
२०२१ मध्ये प्रांजलीने मियामी हॅक वीकमध्ये भाग घेतला. तिथे तिची भेट काही मोठ्या गुंतवणूकदारांशी झाली. तिच्या कल्पनेने प्रभावित होऊन तिला ‘HFO रेसिडेन्सी’ या स्टार्टअप एक्सलेटर प्रोग्राममध्ये प्रवेश मिळाला. या संधीसाठी तिने हायस्कूलमधून काही काळाचा ब्रेक घेतला.
वयाच्या १५ व्या वर्षी तिने ‘Delv.AI’ या तिच्या कंपनीची बीटा आवृत्ती लाँच केली. तिच्या या संकल्पनेला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला तिला ४५ हजार डॉलर्सचा निधी मिळाला. पाहता पाहता, आज तिच्या या AI स्टार्टअपचे मूल्य तब्बल १०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
शिक्षण आणि पुढील प्रवास
एकीकडे बिझनेस सांभाळत प्रांजलीने ‘जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून आपली विज्ञानाची पदवी (Bachelor of Science) पूर्ण केली. एवढ्यावरच न थांबता, मार्च २०२५ मध्ये तिने ‘Salshy’ नावाच्या आणखी एका AI-आधारित ईमेल असिस्टंट प्लॅटफॉर्मची सह-स्थापना केली, ज्याला “हात असलेला चॅटजीपीटी” (ChatGPT with hands) असे म्हटले जाते.
प्रांजली सांगते की, “कमी वयाची संस्थापक असल्यामुळे सुरुवातीला अनेकांनी मला मदत केली, तर काही लोकांनी मला कमीही लेखले. पण आज AI च्या क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे आणि मला सतत नवनवीन गोष्टी बनवून लोकांचे जीवन सोपे करायचे आहे.” अवघ्या १६ व्या वर्षी प्रांजलीने मिळवलेले हे यश आज जगभरातील तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
