Prashant Kishor : बिहार विधानसभेच्या निवडणुका २०२५ मध्ये पार पडल्या. या निवडणुकीत एनडीएला घवघवीत यश मिळालं, तर विरोधकांना अपयशाला सामोरं जावं लागल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच या निवडणुकीत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या पक्षालाही मोठा धक्का बसला होता. जनसुराज पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती. एवढंच काय तर अनेक मतदारसंघात जनसुराज पक्षाच्या उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं.

बिहार विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी बिहारच्या जनतेचा कौल मान्य केला होता. ‘बिहारमध्ये जनसुराज पक्षाचा झालेला पराभव हा माझ्यासाठी मोठा धक्का आणि दुःख आहे’, असं प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर आता प्रशांत किशोर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रशांत किशोर हे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

प्रशांत किशोर हे बिहारच्या बांकीपूर मतदारसंघामधून पोटनिवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. बांकीपूर मतदारसंघामधून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. या मतदार संघातून त्यांचा विजय देखील झाला होता. मात्र, निवडणुकीनंतर काही महिन्यांतच नितीन नबीन हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि राज्यसभेवर निवडून आले. त्यामुळे नितीन नबीन यांनी बिहार विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता लवकरच बांकीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज पक्षाने आतापासून मोठी तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे. यातच प्रशांत किशोर यांनी जनसुराज पक्ष बांकीपूरची पोटनिवडणूक लढवणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. “जन सुराज पक्षाने बांकीपूरची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, २०२५ मध्ये पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत जनसुराज पक्षाला एकही जागा मिळाली नसली तरी सर्व जागांवर मिळून ३.४ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे आता जन सुराज पक्ष बांकीपूरच्या पोटनिवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहे. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात जनसुराज पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता.

Prashant Kishor Bankipur by-election

प्रशांत किशोर बांकीपूरमधून पोटनिवडणूक लढवणार?

जनसुराज पक्षाने बांकीपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे प्रशांत किशोर हे स्वत: बांकीपूरमधून पोटनिवडणूक लढवणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच प्रशांत किशोर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. या पोटनिवडणुकीत तुम्ही जनसुराज पक्षाचे बांकीपूरचे उमेदवार असू शकतात का? मात्र, या प्रश्नावर प्रशांत किशोर यांनी थेट उत्तर देणं टाळलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

प्रशांत किशोर काय म्हणाले?

“बांकीपूरमध्ये फक्त जनसुराज पार्टीच भाजपाला हरवू शकते. आरजेडी आणि काँग्रेसने ही पोटनिवडणूक लढवल्यास मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव होईल. मात्र, आमच्या पक्षाचा विश्वास आहे की आम्हाला फक्त एक मजबूत उमेदवार या ठिकाणी उभा करण्याची गरज आहे”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. तुम्हीच या ठिकाणी उमेदवार असू शकतात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता प्रशांत किशोर म्हणाले की, “हा निर्णय पक्षाचा आहे.”

“आधीच्या विधानसभा निवडणुकीत देखील मी निवडणूक लढवली नाही. कारण पक्षाला वाटलं की मी संघटनात्मक कामावर लक्ष केंद्रित करावं. त्यामुळे आताही मी पक्षाच्या सामूहिक निर्णयाचं पालन करत राहीन. राजकीय पक्ष उभारण्यात भूमिका बजावणारे सर्वच लोक निवडणूक लढवत नसतात. जन सुराज पार्टी लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या रक्ताने, घामाने आणि अश्रूंनी पोसली गेली आहे”, असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

प्रशांत किशोर यांचा मुक्काम आता आश्रमात

जन सुराज्य पक्षाचे संस्थापक आणि प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पाटणा येथील आपलं राहतं घर सोडून ते आता शहराच्या वेशीवर असलेल्या ‘बिहार नवनिर्माण आश्रमात’ राहण्यासाठी गेले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत जन सुराज्य पक्ष आपलं स्थान पक्कं करत नाही, तोपर्यंत याच आश्रमातून पक्षाच्या सर्व राजकीय हालचाली चालतील, असं त्यांनी जाहीर केलं आहे.

दरभंगा येथे पत्रकारांशी बोलताना ४८ वर्षीय प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, “मंगळवारी रात्रीच मी पाटण्यातील माझं घर सोडलं. आयआयटी-पाटणा जवळ असलेला बिहार नवनिर्माण आश्रम हेच आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत माझं ठिकाण असेल.” यापूर्वी ते पाटणा विमानतळाजवळील ‘शेखपुरा हाऊस’ या मोठ्या बंगल्यातून पक्षाचं काम पाहत होते.

Prashant Kishor Bankipur by-election

नितीश कुमार आणि घराणेशाहीवर टीका

प्रशांत किशोर यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. नितीश कुमार यांनी स्वतःच्या राज्यसभेच्या जागेसाठी मुख्यमंत्रीपद सोडल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशांत किशोर म्हणाले होते, “निवडून आलेले मुख्यमंत्री राज्यातील आर्थिक संकट आणि स्थलांतर रोखू शकले नाहीत. त्यांनी स्वतःचं स्थलांतर केलं, पण त्याआधी आपल्या मुलाला राजकारणात सुरक्षित स्थान मिळवून दिलं.” नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार यांनी नुकताच भाजपच्या नेतृत्वाखालील सम्राट चौधरी सरकारमध्ये आरोग्य मंत्री पदाची शपथ घेतली.