जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहारच्या राजकारणात ऐतिहासिक कामगिरी करत भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे. १९ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने मिळालेल्या या विजयामुळे बिहारच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

बांकीपूर हा मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड मानला जात होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केले होते. अशा परिस्थितीत प्रशांत किशोर यांनी मिळवलेला विजय हा जन सुराज पक्षासाठी ऐतिहासिक मानला जात आहे.

मतमोजणीच्या ३२ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी ६३ हजारांहून अधिक मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच पटणा येथील जन सुराज पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.

विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रशांत किशोर यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबतही थेट भाष्य केले. “बिहारच्या जनतेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली किंवा ज्यांच्या चारित्र्य, वर्तन अथवा प्रतिमेबाबत प्रश्न उपस्थित होतात, अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली राज्य नको आहे,” असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

बांकीपूरमधील हा विजय केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून बिहारच्या आगामी राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जन सुराज पक्षाचा आत्मविश्वास वाढल्याचे मानले जात आहे.

“हे केवळ आमदार निवडण्याचं मतदान नव्हतं”

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, “बांकीपूरची ही निवडणूक केवळ आमदार निवडण्यासाठी नव्हती. बिहारच्या जनतेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला स्पष्ट संदेश देण्यासाठी मतदान केले आहे.”

ते पुढे म्हणाले, “बिहारच्या नेतृत्वाची धुरा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा ज्यांच्या चारित्र्य व प्रतिमेबाबत प्रश्न उपस्थित होतात अशा व्यक्तीकडे जाऊ नये, अशी जनतेची इच्छा आहे. राज्याला शिक्षण, रोजगार आणि विकासाला प्राधान्य देणारा सक्षम मुख्यमंत्री हवा आहे.”

“तरुणांचे स्थलांतर थांबवणे हीच खरी गरज”

प्रशांत किशोर यांनी बिहारमधून रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतराचाही मुद्दा उपस्थित केला. “बिहारमधील तरुणांना रोजगारासाठी इतर राज्यांत जावे लागू नये, यासाठी प्रभावी धोरणांची आवश्यकता आहे. राज्यात दर्जेदार शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि सर्वांगीण विकास घडवून आणणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि अमित शाह यांनी बिहारच्या विकासावर विशेष भर द्यावा, रोजगारनिर्मिती करावी आणि स्थलांतर थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

“आम्हाला केवळ आमदार बनून कंत्राटे वाटण्याची इच्छा नाही. बिहारचा विकास हेच आमचे एकमेव ध्येय आहे,” असेही किशोर यांनी स्पष्ट केले.

२०२५ च्या पराभवानंतर जन सुराजमध्ये उत्साह

बांकीपूर पोटनिवडणुकीतील आघाडीमुळे जन सुराज पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. २०२५ मधील बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाने २३८ जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे या पोटनिवडणुकीतील कामगिरी पक्षासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी प्रशासकीय अधिकारी मनोज भारती यांनी या आघाडीला “पक्षाच्या सुवर्णकाळाची सुरुवात” असे संबोधले.

“लोकशाहीत जनतेचाच निर्णय सर्वोच्च असतो. मतदारसंघांना स्वतःची जहागीर समजणाऱ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे,” असे भारती म्हणाले.

बांकीपूरच्या निकालाकडे देशाचे लक्ष

बांकीपूर पोटनिवडणुकीचा निकाल केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून, आगामी बिहारच्या राजकारणावर आणि लोकसभा निवडणुकांपूर्वीच्या राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अंतिम निकालानंतर या विजयाचे राजकीय परिणाम अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.