राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे स्वत:निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रशांत किशोर लढवणार असल्याची घोषणा आज (५ जुलै) जन सुराज पक्षाने केली आहे. त्यामुळे संपूर्ण बिहारचं लक्ष आता बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लागलं आहे.

बांकीपूर मतदारसंघामधून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी २०२५ ची विधानसभेची निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून त्यांचा विजय झाला होता. पण निवडणुकीनंतर काही महिन्यांतच नितीन नबीन हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि राज्यसभेवर निवडून आले. त्यामुळे नितीन नबीन यांनी बिहार विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे बांकीपूर विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक होत आहे.

या पार्श्वभूमीवर जन सुराज पक्षाने बांकीपूरची पोटनिवडणूक लढवण्यासाठी प्रशांत किशोर यांना उमेदवारी दिली. निवडणूक रणनीतीकार ते राजकारणी बनलेल्या प्रशांत किशोर यांची ही पहिलीच निवडणूक आहे. याआधी बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवावी अशा चर्चा होत्या. मात्र, ते प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. दरम्यान, उमेदवारीच्या घोषणेनंतर प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सविस्तर भाष्य केलं आहे.

प्रशांत किशोर काय म्हणाले?

“बांकीपूरमधील जनता ही बिहारमधील सर्वात श्रीमंत आणि सुशिक्षित जनता आहे. त्यांनी सर्वोत्तम उमेदवाराला मतदान करावं. जर त्यांना वाटत असेल की ते माझ्यावर विश्वास ठेवू शकतात, तर मी त्यांना मला मतदान करण्याचं आवाहन करतो. माझ्या पक्षाचा एकमेव आमदार जर मी झालो, तर विधानसभेतील इतर २४२ आमदारांपेक्षा माझं काम अधिक प्रभावी असेल”, असा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे.

३० जुलैला मतदान, ३ ऑगस्टला मतमोजणी

बिहारमधील बांकीपूरसह देशभरातील ३ जागांसाठी ३० जुलै रोजी पोटनिवडणूक होणार असून ३ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, बांकीपूरच्या पोटनिवडणुकीसाठी बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दलानेही उमेदवाराची घोषणा केली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही.