बिहार विधानसभेच्या २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचा दारुण पराभव झाला होता. जन सुराज पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती. एवढंच काय तर अनेक मतदारसंघात जन सुराज पक्षाच्या उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर बिहारच्या जनतेचा कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली होती. या घडामोडीनंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.

प्रशांत किशोर हे स्वत:निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे बिहारमधील बांकीपूर मतदारसंघामधून पोटनिवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आता प्रशांत किशोर बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा जन सुराज पक्षाने केली. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

बांकीपूर मतदारसंघामधून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून त्यांचा विजय देखील झाला होता. मात्र, निवडणुकीनंतर काही महिन्यांतच नितीन नबीन हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि राज्यसभेवर निवडून आले. त्यामुळे नितीन नबीन यांनी बिहार विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे बांकीपूर विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक होत आहे.

या पार्श्वभूमीवर जन सुराज पक्षाने मोठी घोषणा केली. प्रशांत किशोर हे बांकीपूरची पोटनिवडणूक लढवणार असल्याचं जन सुराज पक्षाने रविवारी जाहीर केलं आहे. याबाबत जन सुराज पक्षाने सांगितलं की, पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती, त्यानंतर आज याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणूक रणनीतीकार ते राजकारणी बनलेल्या प्रशांत किशोर यांची ही पहिलीच निवडणूक आहे. याआधी बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवावी अशा चर्चा होत्या. मात्र, ते प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते.

पोटनिवडणूक कधी होणार?

बिहारमधील बांकीपूरसह देशभरातील ३ जागांसाठी ३० जुलै रोजी पोटनिवडणूक होणार असून ३ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. दुसरीकडे बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दलाने सामाजिक कार्यकर्त्या वीणा मानवी यांना बांकीपूर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.