Samrat Choudhary Tejashwi Yadav Class 10th Exam: जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना दहावीची परीक्षा देण्याचे आव्हान दिले. दोघांनीही एकत्र दहावीच्या परीक्षेला बसावे आणि उत्तीर्ण होऊन दाखवावे, असे आमदार प्रशांत किशोर म्हणाले. बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनी ही कल्पना पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडावी, असाही सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर शिक्षण मंत्री तिवारी यांनी त्यांना आधी दहावीत उत्तीर्ण होऊन दाखवण्याचे आव्हान दिले होते. यानंतर विधानावर माध्यमांनी प्रश्न विचारला असता बांकीपूरचे आमदार प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव यांच्यासह मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनाही टोला लगावला.

पीटीआयशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, तेजस्वी यादव यांना दिलेला सल्ला तिवारी यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनाही द्यावा. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी हा प्रस्ताव मांडावा आणि मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना एकत्रित दहावीच्या परीक्षेस बसायला सांगावे.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले, “बिहारच्या युवकांच्या वतीने मीही या दोघांना आवाहन करतो की, त्यांनी दहावीच्या परीक्षेला बसावे. बिहारच्या लोकांना दोन्ही नेत्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते नक्कीच दहावीच्या परीक्षेत यश मिळवतील. चौधरी आणि यादव यांनी हे आव्हान स्वीकारायला हवे.”

मिथिलेश तिवारी काय म्हणाले होते?

मिथिलेश तिवारी यांनी एएनआयशी बोलताना म्हटले होते की, राष्ट्रीय जनता दलाचे कार्याध्यक्ष तेजस्वी यादव यांनी नववीत नापास झाल्यानंतर शाळा सोडली होती. त्यांनी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यापूर्वी आधी स्वतः दहावीची परीक्षा उत्तीर्ण करून दाखवावी.

“ज्या व्यक्तीने कोणत्याही बोर्डाची परीक्षा दिलेली नाही. ते आता परीक्षेवर सल्ला देत आहेत, हे पाहून मला आश्चर्य वाटले. तेजस्वी यादव यांनी आमच्या बिहार सरकारच्या शाळेत प्रवेश घेऊन दहावीत उत्तीर्ण व्हावे, मग परीक्षेबाबत सल्ला द्यावा. तो आम्ही नक्कीच विचारात घेऊ”, अशी टीका मिथिलेश तिवारी यांनी केली.

सम्राट चौधरी सातवी पास

प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचा शिक्षणाचा मुद्दा अनेकदा उपस्थित केलेला आहे. २०१० साली निवडणूक प्रतिज्ञापत्रात सम्राट चौधरी यांनी आपली माहिती भरताना ते सातवी पास असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्याकडे डीलीट पदवी असल्याचा दावा केला होता, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला.