Premium

प्रशांत किशोर यांनी सांगितली भाजपाच्या विजयाची चार कारणं, काँग्रेसला सल्ला देत म्हणाले…

प्रशांत किशोर यांनी काही वेळापूर्वी बिहारमध्ये प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, तुम्हाला कोणालाही हरवायचं असेल तर तुम्हाला त्याची ताकद माहिती असणं आवश्यक आहे.

prashant kishore explained how bjp won
राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी चार राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केलं आहे. (PC : ANI File)

नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. चारपैकी तीन राज्यांमध्ये बहुमत मिळवत भाजपाने काँग्रेसला नमवलं आहे. भाजपाने काँग्रेसच्या ताब्यात असलेली दोन राज्ये (राजस्थान आणि छत्तीसगड) हिरावली आहेत. तर, मध्य प्रदेशमधील आपली सत्ता कायम राखली आहे. प्रत्येक व्यक्ती, राजकीय जाणकार, पत्रकार आणि विश्लेषक भाजपाच्या विजयाचं किंवा काँग्रेसच्या पराभवाचं विश्लेषण करत आहेत. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीदेखील या निकालावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रशांत किशोर यांनी काही वेळापूर्वी बिहारमध्ये प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, तुम्हाला कोणालाही हरवायचं असेल तर तुम्हाला त्याची ताकद माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही भाजपाविरोधात लढत आहात तर मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे की लोक भाजपाला मत का देतात? तुम्ही जोवर त्यांची ताकद जाणून घेत नाही, त्यांच्यापेक्षा उत्तम काही करत नाही तोवर लोक तुम्हाला मत देणार नाहीत. भाजपाला केवळ मोदींच्या नावावर मतं मिळत नाहीत. भाजपाला लोकांची मतं मिळण्याची चार प्रमुख कारणं आहेत.

प्रशांत किशोर म्हणाले, भाजपाच्या विजयाचं पहिलं कारण म्हणजे हिंदुत्व. भारतीय समाजातला एक मोठा वर्ग आहे जो हिंदुत्वाशी बांधला गेला आहे. या वर्गाचा भाजपाच्या हिंदुत्वावर विश्वास आहे. त्यामुळे ते भाजपाला मत देतात. भाजपाची दुसरी ताकद म्हणजे नवा राष्ट्रवाद. तुम्ही हल्ली ऐकत असाल की भारत आता विश्वगुरू बनतोय, पंतप्रधान मोदी यांनी जगभरात भारताची शान वाढवली आहे, भारतात जी-२० सारखी परिषद होते, पुलवामाचा दहशतवादी हल्ला तुम्हाला आठवत असेल, लोकांनी पुलवामाच्या नावावर भाजपाला मतं दिली होती. राष्ट्रवादाची भावना निर्माण करून भाजपाला लोकांची मतं मिळवता येतात.

हे ही वाचा >> “…म्हणून तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला”, ममता बॅनर्जींनी सुनावलं

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर म्हणाले, भाजपाच्या विजयाचं तिसरं कारण म्हणजे, योजनांचे लाभार्थी, ज्यांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो, लोकांना शौचालय बांधून दिलं जातं, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळतो, घर बांधून मिळतं किंवा थेट पैसे मिळतात, हे लाभार्थी सरकारची कृपा विसरत नाहीत. मग ते भाजपाला मत देतात. भाजपाची चौथी जमेची बाजू म्हणजे त्यांची पक्षसंघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. भाजपाची संघटना मजबूत आहे. तसेच आर्थिक स्तरावर ते मजबूत आहेत. उदाहरणार्थ तुम्ही राष्ट्रीय जनता पार्टीकडून निवडणूक लढत असाल तर तुम्हाला निवडणुकीच्या तिकीटासाठी पक्षाला पैसे द्यावे लागतील. परंतु, तुम्ही जर भाजपाकडून निवडणूक लढत असाल तर पक्षच तुम्हाला पैसे देतो. या चार कारणांमुळे भाजपा प्रत्येक निवडणुकीत जिंकतेय. काँग्रेसला जर भाजपाविरोधात जिंकायचं असेल तर या चार गोष्टींवर काम करावं लागेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prashant kishor explain 4 reasons of bjp win in assembly election results 2023 asc

First published on: 04-12-2023 at 20:12 IST
Next Story
“…म्हणून तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला”, ममता बॅनर्जींनी सुनावलं