Prashant Kishor onBihar Election Result : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष या निवडणूकीत प्रभाव टाकू शकले नाहीत. या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाची देखील चांगलीच चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र या पक्षालाही बिहारमध्ये खातेही उघडता आले नाही.

या निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार मोहिम राबवली होती. त्यांनी निवडणुकीच्या खूप आधीपासून बिहारमध्ये पदयात्रा काढून सामान्य लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न पाहून देशभरात बिहार निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र राजकीय वर्तुळाच हवा निर्माण करणाऱ्या जन सुरज पक्षाला मतदारांनी मात्र साफ नाकारलं. यानंतर आता जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा पक्ष उभारणीला सुरूवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यादरम्यान त्यांनी ‘बीबीसी न्यूज हिंदी’ला दिलेल्या एका मुलाखतीत या निवडणुकीतून इतक्या मेहनतीनंतर त्यांनी काय साध्य केलं याबद्दल भाष्य केले आहे.

निवडणुकीतून मिळालं काय?

तीन वर्षांचा काळ, कोट्यवधींचा खर्च आणि संपूर्ण बिहारची पदयात्रा केल्यानंतर या निवडणुकीतून काय मिळवलं? असा प्रश्न प्रशांत किशोर यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना किशोर म्हणाले की, “जर तुम्ही निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पाहिले तर फार काही हाती लागले नाही. पण समाज आणि राजकारणाच्या दृष्टीने पाहाल तर बरंच काही मिळवलं आहे.”

काय मिळवता आलं नाही याबद्दल बोलताना किशोर पुढे म्हणाले की, “आमचा विचार होता की तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर बिहारमध्ये एक मोठा इलेक्टोरल शिफ्ट लोकांना पाहायला मिळेल, एक पर्याय समोर येईल, एक नवीन व्यवस्था दिसेल, पण ते झाले नाही. इतकेच नाही तर जन सुराजला इतके टक्के मतेही मिळाले नाहीत की आम्ही स्वत:ला बिहारमध्ये रजिस्टर्ड पक्ष म्हणून चालवू शकू, त्यासाठी ६ टक्के मते हवी असतात, तेही मिळाली नाहीत.”

पहिल्यांदा पलायन हा मुद्दा बनला

पण पक्षाची सामाजिक आणि राजकीय दृष्टीने मर्यादित स्वरुपात का असेना पण काही बाबती चांगली राहिली असेही किशोर यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, “पहिल्यांदा बिहारमध्ये जातीचे राजकारण त्या पद्धतीने होताना दिसले नाही ज्या प्रकारे मागील ३०-३५ वर्षात लोकांनी पाहिले आहे. पहिल्यांदा हिंदू-मुस्लिम या मुद्द्यांवर निवडणूक लढली गेली नाही. याचा अर्थ असा नाही की जाती आणि धर्माचा प्रभाव राहिला नाही. मात्र ज्या प्रकारे खुलेआम पूर्ण निवडणूक याच मुद्द्यावर होत असे ते झाले नाही. पहिल्यांदा सत्ताधारी पक्ष आणि विरोधक या सर्वांना नोकरी, पलायन, रोजगार यावर बोलणे भाग पडले. पहिल्यांदा बिहारमध्ये पलायन हा मुद्दा बनला.”

हे करणे जमले नाही

एक मोठा फॅक्टर हा आहे की जंगल राजच्या भीतीमुळे नितीश-भाजपा यांना आणि भाजपाच्या भीतीने लालू यादव यांना मते देण्याची जी प्रक्रिया आहे ती आम्ही तोडू शकलो नाहीत आणि तेच कुठेतरी निकालात बऱ्याच प्रमाणात दिसत आहे, असेही प्रशांत किशोर यावेळी म्हणाले.