निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विरोधी पक्षांची एक आघाडी उभारण्यासाठी आपण मदत करु इच्छितो असं म्हटलं आहे. ही आघाडी २०२४ मध्ये भाजपाला पराभूत करु शकते, असा विश्वासही प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलीय. ‘हे खरोखर शक्य आहे’, असं सांगतानाच पुढील महिन्यामध्ये पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागले तरी २०२४ मध्ये भाजपाला पराभूत करणारी आघाडी बांधता येईल असंही प्रशांत किशोर म्हणालेत. आगामी पाच राज्यांमधील निवडणुका या लोकसभेची पूर्वतयारी मानल्या जात असतानाही या निवडणुकांच्या निकालावर आधारित न राहता २०२४ मध्ये भाजपाला पराभूत करता येईल, असं प्रशांत किशोर म्हणालेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेगवेगळ्या राजकीय पक्षांना थोडा समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. एका नवीन राष्ट्रीय पक्षाऐवजी राजकीय परिस्थितीबद्दल विचार करताना ‘थोडा बदल केल्यास’ हे शक्य आहे, असं प्रशांत किशोर म्हणालेत. “२०२४ मध्ये भाजपाला पराभूत करणं शक्य आहे का? याचं उत्तर मी ठामपणे होय असं आहे. मात्र सध्या वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि पक्षांची धोरणं पाहता हे शक्य आहे का? असा प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर कदाचित नाही, असं द्यावं लागेल,” असं मत प्रशांत किशोर यांनी मांडलंय.

“तुम्ही जर बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळचा विचार केल्यास लोकसभेच्या जवळजवळ २०० जागा आहेत. पक्षाची लोकप्रियता शिगेला असतानाही भाजपा या ठिकाणी ५० च्या आसापासच जागा जिंकू शकलीय. बाकी राहिलेल्या ३५० जागांपैकी भाजपा कोणासाठी काहीच सोडत नाहीय,” असं सध्याच्या परिस्थितीचं विश्लेषण करताना प्रशांत किशोर म्हणाले.

“यावरुन असं दिसून येतं की काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेस किंवा अन्य एखादा पक्ष अथवा या पक्षांचा एकमेकांमध्ये ताळमेळ बसून एक आघाडी तयार होणार असेल तर त्यांनी एकत्रित येऊन आम्ही २०० पैकी १०० जागा जिंकणार असा निश्चय केल्यास विरोधी पक्षांना त्यांच्या लोकसभेमधील जागा २५०-२६० पर्यंत वाढवता येतील,” असंही प्रशांत किशोर यांनी अंदाज व्यक्त करताना म्हटलंय. “अशाच प्रकारे उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये १०० आणखीन जागा मिळवून भाजपाला पराभूत करणं शक्य आहे,” असा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलाय. “मला विरोधकांची अशी एक आघाडी बनवण्यात मदत करायची आहे जे २०२४ सालच्या निवडणुकीमध्ये सक्षमपणे लढू शकतील,” असंही प्रशांत किशोर म्हणालेत.

भाजपाने हिंदुत्व, ‘अति-राष्ट्रवाद’ आणि लोककल्याण या मुद्द्यांच्या जोरावर एक विजयगाथा सादर केली आहे. विरोधी पक्षांना भाजपाला पराभूत करण्यासाठी किमान यामधील दोन मुद्द्यांवर आघाडी मिळावी लागेल. तसेच एक काथकथित ‘महागठबंधन’ तयार करण्याबरोबरच बरंच काही करावं लागणार असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलंय.

भाजपाला २०२४ मध्ये पराभूत करणं शक्य आहे पण त्यासाठी विरोधी पक्षांना खऱ्या अर्थाने एकत्र यावं लागेल असं प्रशांत किशोर म्हणालेत. “२०२४ मध्ये भाजपाला पराभूत करणं शक्य पण त्यासाठी विरोधी पक्षांनी खऱ्या अर्थाने एकत्र येण्याची गरज आहे,” असंही प्रशांत किशोर म्हणालेत. यासाठी त्यांनी बिहारचं उदाहरण दिलंय. “बिहारमध्ये २०१५ नंतर एकही ‘महागठबंधन’ यशस्वी झालं नाही. केवळ राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एकत्र येऊन काही होत नाही. भाजपाला हरवण्यासाठी तुम्हाला भावनात्मक आणि सुनियोजित पद्धतीने एकत्र येण्याची गरज आहे,” असं प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor says possible to defeat bjp in 2024 but it needs to create opposition bloc scsg
First published on: 25-01-2022 at 09:13 IST