प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; काँग्रेसच्या बैठकीनंतर चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या एका बैठकीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

prashant kishor meets rahul gandhi
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

काही महिन्यांपूर्वी झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांमुळे रणनितीकार प्रशांत किशोर चांगलेच चर्चेत राहीले. निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासारख्या बड्या नेत्यांची किशोर यांनी अनेकदा किशोर भेट घेतली. काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या एका बैठकीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

२२ जुलै रोजी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला कमल नाथ, मल्लिकार्जुन खर्गे, ए.के. अँटनी, अजय माकन, आनंद शर्मा, हरीश रावत, अंबिका सोनी आणि के.सी. वेणूगोपाल यासारख्या मोठ्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. आठवडाभरापूर्वी झालेल्या या बैठकीत प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सहभागी करुन घेता येईल का?, पक्षाच्या नियोजनानुसार त्यांना पक्षात सामावून घेता येईल का यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.

या बैठकीत राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या भेटीत चर्चेत आलेल्या मुद्द्यांची माहिती बैठकीला उपस्थित असणाऱ्या नेत्यांना दिली. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये त्यांच्या भूमिकेसह पक्षासाठी काही योजना आखल्या आहेत, त्या योजनांबद्दलची माहिती राहुल गांधी यांनी या बैठकीत दिली. प्रशांत किशोर पक्षाबाहेर राहून केवळ सल्लागार म्हणून काम करू शकतात का, की ते काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, याबाबत चर्चा करून राहुल गांधींनी वरीष्ठांची मतं जाणून घेतल्याचं या बैठकीत हजर राहिलेल्या एका काँग्रेस नेत्यांने सांगितलं.

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास पक्षाला त्याचा नक्कीच फायदा होईल. मात्र, त्यांची पक्षातील नेमकी भूमिका काय असेल, ते ठरवणं गरजेचं आहे, असं एका काँग्रेस नेत्याने सांगितलं. गेल्या वर्षी झालेल्या बिहार निवडणुकांची पार्श्वभूमी पाहता काँग्रेस किशोर यांच्या कामावर मर्यादा आणेल, असंही म्हटलं जातंय. सध्या पक्षाच्या चांगल्या कामगिरीसाठी नवनवीन कल्पना आणि रणनीती आखणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रशांत किशोर पक्षात आल्यास कोणतंही नुकसान होणार नाही. मात्र, त्यांची भूमिका आणि पक्षासाठी काम करण्याच्या क्षमतांबद्दल नक्कीच चर्चा होऊ शकते, असं एका वरीष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडिया टूडेशी बोलताना म्हटलं.

दरम्यान, याबाबत अद्याप काँग्रेस पक्षाकडून किंवा प्रशांत किशोर यांच्याकडून अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आलेला नाही. काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यामध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि २०२२ मध्ये होऊ घातलेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prashant kishor will join congress rumours after congress leaders meeting with rahul gandhi hrc