Prashant Kishor On Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने २०२ जागा जिंकल्या, तर या निवडणुकीत विरोधकांचा दारूण पराभव झाला. तसेच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या पक्षालाही बिहारच्या जनतेने मोठा धक्का दिला. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केली आहे.
प्रशांत किशोर हे पुढील पाच वर्षांत त्यांच्या उत्पन्नातील ९० टक्के रक्कम त्यांच्या पक्षाला म्हणजे जनसुराज पक्षाला देणार आहेत अशी घोषणाच त्यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुराज पक्षाला पराभवाचा धक्का बसल्यानंतर काही दिवसांतच प्रशांत किशोर यांनी ही घोषणा केली. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
प्रशांत किशोर यांनी १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ‘बिहार नवनिर्माण संकल्प यात्रा’ची घोषणा देखील केली. या यात्रेच्या माध्यमातून जन सुराजचे कार्यकर्ते राज्यातील प्रत्येक घराला भेट देतील आणि सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होते की नाही हे पाहतील. “आम्ही १५-१८ महिन्यांत राज्यातील सर्व घरांना भेट देऊ आणि या सरकारच्या आश्वासनांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करू, तसेच ही मोहीम सुरू होण्यापूर्वी जन सुराज पक्षाचे संघटन मजबूत करण्यात येईल”, असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं.
प्रशांत किशोर म्हणाले की, “गेल्या २० वर्षात मी जी काही संपत्ती मिळवली, ती सर्व संपत्ती फक्त दिल्लीतील माझं घर वगळता, मी ती पक्षासाठी दान करणार आहे. तसेच आता मी बिहारच्या लोकांनाही दरवर्षी फक्त १,००० रुपये पक्षाला दान करण्याची विनंती करतो”, असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
‘जनसुराज’चा पराभव का झाला? प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया
बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रशांत किशोर नुकतीच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले, पण ते पूर्णपणे अयशस्वी झाले. हे मान्य करण्यात काही गैर नाही. आम्ही बिहारच्या सत्तेत बदल घडवून आणू शकलो नाही. मात्र, बिहारचं राजकारण बदलण्यात आम्ही नक्कीच काही महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. आमच्या प्रयत्नांमध्ये म्हणजे जनतेने आम्हाला निवडून दिलं नाही, त्यात काही चूक झाली असेल. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला नाही, त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. मी ती जबाबदारी १०० टक्के स्वतःवर घेतो की मी बिहारच्या लोकांचा विश्वास जिंकू शकलो नाही”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.
