Prateek Yadav death updates: समाजवादी पक्षाचे दिवंगत संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव यांचे मंगळवारी लखनौमध्ये निधन झाले. वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रतीक यादव यांचे लखनौमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबातील अनेक सदस्य रुग्णालयात उपस्थित होते. प्रतीक हे भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती होते.
गेल्या काही दिवसांपासून आजारी होते प्रतीक यादव
आज सकाळीच ६ वाजता प्रतीक यांना लखनऊच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक यादव यांची प्रकृती ठीक नव्हती. काही आठवड्यांपूर्वी लखनऊच्या मेदांता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. यावेळी अखिलेश यादव यांनीही त्यांची भेट घेतली होती. उपचारांदरम्यान प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते, असं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलं आहे. दरम्यान, सिव्हिल रुग्णलायाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पंचनामा करण्यात येणार आहे.
कोण आहेत प्रतीक यादव
प्रतीक यादव हे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ आहेत. मोठी राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही प्रतीक यादव राजकारणापासून लांब होते. त्यांनी लीड्स विद्यापीठातून शिक्षण घेतलं असून रिअल इस्टेट आणि फिटनेस क्षेत्रात ते कार्यरत होते. दि फिटनेस प्लॅनेट नावाचं जिमही ते चालवत होते. जीव आश्रय नावाच्या एका संस्थेद्वारे ते प्राण्यांसाठी अनेक उपक्रमही राबवत होते. या संस्थेद्वारे ते भटक्या कुत्र्यांचा बचाव करणे, उपाचर देणे आणि काळजी करण्याचं काम करत होते. ते प्रामुख्याने त्यांच्या उच्चभ्रू जीवनशैलीसाठी ओळखले जात होते. त्यांच्याकडे लक्झरी गाड्यांचा संग्रह होता.
प्रतीक यादव यांचं २०१२ मध्ये अर्पणा यादव यांच्याशी विवाह झाला. त्यांना एक मुलगीही आहे. मात्र, मधल्या काही दिवसांत या जोडप्यात वाद सुरू झाले होते. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. याबाबत खुद्द प्रतीक यादव यांनीच सोशल मीडियावरून माहिती दिली होती. अर्पणा यादव या भाजपा नेत्या असून उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्षाही आहेत.
