करण्याची आईवडिलांची मागणी
दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तिच्या आईवडिलांनी केली आहे. प्रत्युषाचा सुनियोजित पद्धतीने खून केला असून, मुंबई पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नाही, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी त्यांनी जमशेदपूर या त्यांच्या मूळ शहरात सहय़ांची मोहीम राबवून केली आहे.
शंकर बॅनर्जी व सोमा बॅनर्जी यांनी मुंबई पोलिसांनी तपासात गलथानपणा केल्याचा आरोप करून असे म्हटले आहे, की प्रत्युषाच्या खूनप्रकरणात आम्ही सत्य बाहेर काढण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी करीत आहोत. या प्रकरणात प्रत्युषाचा मित्र राहुल राजवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला तरी तो मोकाट फिरत आहे. जसा काही तो पोलिसांचा जावईच आहे.
आम्हाला न्याय हवा आहे व राहुलला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे सांगून त्यांनी सीबीआय चौकशीसाठी स्वाक्षऱ्यांची मोहीम सुरू केली.
साकची मार्केट भागात सायंकाळी पाच ते आठदरम्यान ही स्वाक्षऱ्यांच्या मोहीम घेण्यात आली. यात ऑनलाइन याचिकेवरही ७०० जणांनी सीबीआय चौकशीला पाठिंबा दिला आहे. आम्ही झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास व महिला आयोगाच्या अध्यक्षांना रांचीत भेटणार आहोत असे त्यांनी सांगितले.