दिल्लीतील भाजपाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश साहिब सिंह यांच्याकडून कानशिलात लगावण्यात आल्याचा आरोप असलेल्या २२ वर्षीय साहिब सिंह या तरुणाने आता या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. “मी मंत्र्यांना किंवा कोणालाही शिवीगाळ केली नव्हती. आमदार जरनैल सिंह यांच्या सांगण्यावरून मी केवळ या संपूर्ण पाहणीचा थेट व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो,” असा दावा साहिब सिंह याने केला आहे.

पश्चिम दिल्लीतील विकासपुरी भागात रविवारी दुपारी एका नवनिर्मित रस्त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री प्रवेश साहिब सिंह पोहोचले होते. यावेळी आम आदमी पक्षाचे (आप) आमदार जरनैल सिंह आणि पक्षाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. या पाहणीदरम्यान मंत्री आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, ज्याचे रूपांतर एका मोठ्या राजकीय वादात झाले.

“माझ्याकडे व्हिडिओचे स्पष्ट पुरावे”

‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना पदवीचे शिक्षण घेणारा साहिब सिंह म्हणाला, “मी माझ्या पालकांसोबत राहतो आणि गेल्या चार वर्षांपासून आमदार जरनैल सिंह यांच्या सोशल मीडिया टीमशी जोडलेला आहे. आमदारांच्या सूचनेनुसार मी या पाहणीचे इन्स्टाग्रामवरून थेट प्रक्षेपण करत होतो. मी मंत्री किंवा इतर कोणालाही कोणतीही शिवीगाळ केलेली नाही.”

“माझ्याकडे मी लाईव्ह स्ट्रीम केलेल्या व्हिडिओचे संपूर्ण रेकॉर्डिंग आहे. त्या व्हिडिओमध्ये आमचे झालेले सर्व संभाषण स्पष्टपणे ऐकू येते,” असा दावाही साहिब सिंह याने केला आहे.

रस्त्याच्या निकृष्ट दर्जावरून रंगला वाद

घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये मंत्री प्रवेश साहिब सिंह आपल्या सुरक्षा रक्षकांसह नवनिर्मित रस्त्याची पाहणी करताना दिसत आहेत. यावेळी आमदार आणि ‘आप’ कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या अत्यंत निकृष्ट दर्जाकडे लक्ष वेधले. “नुकताच तयार केलेला रस्ता हाताने उखडला जात असून त्याचे खडे सहजरीत्या हातात येत आहेत,” असा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. या वादानंतर मंत्र्यांनी साहिब सिंह याला चापट मारल्याचा आरोप आहे.

पोलिसांत तक्रार दाखल; FIR ची मागणी

या घटनेनंतर मंत्री प्रवेश साहिब सिंह यांनी एक व्हिडिओ जारी केला होता. प्रक्षोभक वक्तव्ये आणि शिवीगाळ केल्यामुळेच आपला संयम सुटल्याचा दावा मंत्र्यांनी केला होता. मात्र, साहिब सिंह याने मंत्र्यांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

साहिब सिंह याने याप्रकरणी विकासपुरी स्थानिक पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित मंत्र्यांवर त्वरित एफआयआर (FIR) नोंदवून कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे दिल्लीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘आप’ विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पेटला आहे.