असहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने केलेल्या वक्तव्यावर भाजपचे नेते राम माधव यांनी गुरुवारी जोरदार टीका केली. देशाच्या प्रतिष्ठेबद्दल आमिर खानने केवळ रिक्षाचालकालाच उपदेश करू नये, तर आपल्या पत्नीलाही उपदेश करावा, असे राम माधव यांनी म्हटले आहे.

भविष्यात पुरस्कार वापसीची गरज भासू नये अशी स्थिती सरकार निर्माण करील, मात्र देशाची सीमा आणि स्वाभिमान यांच्याशी कोणत्याही स्थितीत तडजोड केली जाणार नाही, असेही राम माधव यांनी स्पष्ट केले. दिल्ली विद्यापीठाच्या एसजीबीटी खालसा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राम माधव संबोधित करीत होते. देशाची प्रतिष्ठा कशी जपावी याचा उपदेश केवळ रिक्षाचालकास करून भागणार नाही तर त्याच वेळी आपल्या पत्नीलाही तो उपदेश केला पाहिजे, असेही राम माधव यांनी म्हटले आहे. आमिरने असहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता.