Pregnant woman along with two minor daughters pushed into swimming pool : तेलंगणात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुलगा हवा म्हणून गरोदर पत्नीची हत्या करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर पोटच्या दोन मुलींनाही ठार करण्यात आलं आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं असून याप्रकरणी संशयित आरोपी पतीचा शोध सुरू आहे.

तेलंगणातील वारंगल-खम्मम राष्ट्रीय महामार्गावरील कौटुंबिक मालमत्तेत असलेल्या स्विमिंग पूलमध्ये गुरुवारी सकाळी फरहान (२६) आणि तिच्या दोन अल्पवयीन मुली, उमेरा (८) आणि आयेशा (६) यांचे मृतदेह आढळले. पती अजहरुद्दीनने सुरुवातीला पोलिसांना सांगितले होते की, बुधवारी रात्री तिघीही चुकून पूलमध्ये पडून बुडाल्या. मात्र, त्याच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांनी तपासात बदल केला. फरहानच्या वडिलांनी दिलेल्या जबानीमुळे पोलिसांना दिशा मिळाली. अजहरुद्दीनेच या तिघींना मारलं असल्याचा दावा फरहानच्या वडिलांनी केला.

वडिलांनी पोलिसांना सांगितले की, अजहरुद्दीन आणि फरहान यांचा प्रेमविवाह झाला होता, परंतु अलीकडेच त्यांच्यात वाद होत होते. फरहान पुन्हा एका मुलीला जन्म देणार असल्याचे समजल्याने हा वाद वाढला होता, कारण अजहरुद्दीनला मुलगा हवा होता. त्याने फरहानवर गर्भपातासाठी दबाव टाकला होता. मात्र, गर्भपातासाठी तिने नकार दिला. “माझी मुलगी अनेक दिवसांपासून दबावाखाली होती. हा अपघात आहे यावर आमचा विश्वास नाही”, असं तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं.

काही अहवालांनुसार, अजहरुद्दीनने फरहान आणि मुलींना पूलमध्ये नेऊन पाण्यात ढकलले. परिणामी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर काही अहवालांनुसार, स्थानिक आणि नातेवाईकांनी त्यांना वाचवण्यासाठी वारंगलमधील एमजीएम (MGM) हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पतीविरोधात पुरावे काय?

घटनेच्या वेळी अजहरुद्दीनच्या मोबाईलचे लोकेशन स्विमिंग पूलजवळ आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. तसेच, मृत्यूच्या काही वेळ आधीच पूल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.