Rahul Gandhi Pregnant Journalist News Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला जावा आणि निवडणूक आयोगाची एसआयआर प्रक्रिया थांबविण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी इंडिया आघाडीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना भेटण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान विरोधकांकडून याचिका दाखल करण्यासाठी राहुल गांधी शिष्टमंडळासह सर्वोच्च न्यायालयात गेले असता तिथे एका गरोदर महिला पत्रकाराला धक्काबुक्की झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. आरोप करणारी महिला पत्रकार सध्या रुग्णालयात आहे. यावरून भाजपाने राहुल गांधींना लक्ष्य केले आहे, तर काँग्रेसने हे दावे खोटे असल्याचे म्हटले.
रिचा पराशर असे या महिला पत्रकाराचे नाव असून त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना त्यांच्याबरोबर घडलेला प्रसंग सांगितला. राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात आले असताना त्यांनी माझ्या हाताला पकडून बाजूला सारले आणि त्यामुळे मी जमिनीवर पडली. या धक्काबुक्कीत मी गुडघ्यावर पडले आणि माझा फोन फुटला, असा आरोपही त्यांनी केला.
“राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात येणार होते. यासाठी मी तिथे वार्तांकन करण्यासाठी माईक घेऊन उभी होते. विरोधी पक्षनेत्यांचा बाईट घ्यायला मिळणार म्हणून मी आनंदी होते. माझ्या वरीष्ठांनाही आनंद वाटेल, असे मला वाटले. म्हणून मी माईक पकडून गेटवर उभी होते. पण ते आत येत असताना त्यांच्या लोकांनी मला बाजूला जाण्याचा हाताने इशारा केला. पण त्यानंतर पुन्हा बाईट घेण्यासाठी सगळे माध्यमांचे प्रतिनिधी पुढे आल्यानंतर मी पुन्हा बाईट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही धक्काबुक्कीची घटना घडली”, असे रिचा पराशर म्हणाल्या.
रिचा पराशर पुढे म्हणाल्या, “या घटनेचा व्हिडीओ आमच्या आणि इतर माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. राहुल गांधी आणि नंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मला धक्का दिला. ज्यामुळे मी पायऱ्यांवर पडले.” पराशर यांनी या घटनेनंतर आपल्या इन्स्टाग्रामवरही एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्या म्हणाल्या की, पितृसत्ताक पद्धत मोडीत काढा म्हणणाऱ्या माणसाने मला ढकलले.
मी पडलेली असताना कशीबशी उठले. त्यानंतर राहुल गांधी यांच्याबरोबरचे लोक माझ्याच अंगावर ओरडले. तू पडलेलीच नाहीस, असेही ते लोक बोलत होते. मात्र मी एका पत्रकाराला खाली पाडल्याबाबत जाब विचारत होती, तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणा देत होते, असाही आरोप रिचा पराशर यांनी केला.
भाजपाकडून टीका
भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी रुग्णालयात जाऊन रिचा पराशर यांची भेट घेतली. तसेच या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी राहुल गांधीवर टीका केली. एका महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का देऊन पाडले. त्या महिला पत्रकारावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिला पत्रकाराला धक्काबुक्कीनंतर खाली पडल्यानंतर एकाही काँग्रेस कार्यकर्त्याने त्यांना हात देऊन उचलले नाही. यावरूनच त्यांच्या मनात महिलांबद्दल कोणत्या प्रकारची भावना आहे, हे दिसून येते.
काँग्रेसकडून प्रत्युत्तर
काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपाकडून अपप्रचार करत असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले. अलका लांबा म्हणाल्या की, एकतर गरोदर असताना अशा आंदोलनाच्या ठिकाणी वार्तांकन करायला जाणे जोखमीचे आहे. दुसरे म्हणजे, राहुल गांधी यांनी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास धक्का दिल्याचा दावा केला. मात्र उपचारासाठी ते रात्री ८.३० वाजता दाखल झाले. महिला पत्रकाराची बहीण भाजपा कार्यालयात गेल्यानंतर हे कहाणी रचण्यात आली. त्यांनी एक्स-रे केल्याचा दावा केला, मात्र गरोदर असताना एक्स-रे केला जात नाही, असे सांगून अलका लांबा यांनी पत्रकाराचे दावे फेटाळून लावले.
