Preparation action against Richa Chadha controversial tweet case Information Home Minister of Madhya Pradesh ysh 95 | Loksatta

वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती

पीटीआय, भोपाळ : अभिनेत्री रिचा चड्ढाने केलेल्या वादग्रस्त ‘ट्वीट’बाबत तक्रार प्राप्त झाली आहे, या प्रकरणी कोणती कायदेशीर कारवाई करावी, याबाबत पोलिसांचा सल्ला मागवला आहे, असे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शनिवारी सांगितले.  या ‘ट्वीट’मध्ये रिचाने २०२० मधील चिनी लष्कराशी भारतीय लष्कराच्या गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षांचा संदर्भ देत लष्कराची खिल्ली उडवल्याने तिच्यावर टीका होत आहे. […]

वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती
रिचा चड्ढा

पीटीआय, भोपाळ : अभिनेत्री रिचा चड्ढाने केलेल्या वादग्रस्त ‘ट्वीट’बाबत तक्रार प्राप्त झाली आहे, या प्रकरणी कोणती कायदेशीर कारवाई करावी, याबाबत पोलिसांचा सल्ला मागवला आहे, असे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शनिवारी सांगितले.  या ‘ट्वीट’मध्ये रिचाने २०२० मधील चिनी लष्कराशी भारतीय लष्कराच्या गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षांचा संदर्भ देत लष्कराची खिल्ली उडवल्याने तिच्यावर टीका होत आहे. तिच्या ‘ट्वीट’मागे तिची ‘तुकडे-तुकडे’ (फुटीरतावादी) मानसिकता दिसत असल्याची टीकाही मिश्रा यांनी रिचावर केली.

लष्कराच्या उत्तर विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ट्वीट’ केले होते, की भारतीय सैन्य पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पुन्हा मिळवण्यासाठी सरकारच्या आदेशाची वाट पाहत आहे. त्यावर प्रतिक्रियेदाखल रिचाने ‘गलवान ‘हाय’ म्हणतोय’ (गलवान सेज हाय) असे ‘ट्वीट’ केले होते. त्यावर सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.भारतीय सशस्त्र दलांच्या बलिदानाची खिल्ली उडवल्याबद्दल रिचावर टीका होत आहे. या टीकेनंतर, रिचाने समाजमाध्यमाद्वारे माफी मागितली होती. रिचाने असे म्हटले होते, की भारतीय लष्कराच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता.

यासंदर्भात शनिवारी चित्रफितीद्वारे दिलेल्या निवेदनात मिश्रा म्हणाले, की या अभिनेत्रीने लष्कर आणि चित्रपटांतला फरक समजून घ्यावा. चित्रपटाचे आभासी जीवन आणि वास्तविक जीवनात फरक आहे. एक सैनिक देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल हवामानालाही तोंड देतो. या टिप्पणीमुळे देशभक्त दुखावले गेले आहेत. ही टिप्पणी रिचाची ‘तुकडे-तुकडे’ मानसिकता (फुटीरतावादी) दर्शवते. तिच्याविरोधात तक्रार आली आहे. आम्ही ती पोलिसांकडे कायदेशीर कारवाई संदर्भातले मत मागवले आहे. मिश्रांनी असेही निदर्शनास आणून दिले, की श्रद्धा वालकरची आफताब पूनावालाने हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले, या हत्येवर रिचाने मौन राखले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 00:02 IST
Next Story
Shraddha Walker murder case: पोलिसांना डीएनए चाचणी अहवालाची प्रतीक्षा