पीटीआय, कोलंबो : श्रीलंकेतील आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाच्या विरोधात अभूतपूर्व हिंसाचार आणि व्यापक निदर्शने सुरू असताना, सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी या आठवडय़ात कायदे मंडळाचे अधिवेशन बोलवावे, अशी विनंती कायदे मंडळाच्या अध्यक्षांनी मंगळवारी  राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांना केली.

 या विनंतीसाठी आपण अध्यक्ष गोताबया यांना दूरध्वनी केला असल्याचे कायदे मंडळाचे अध्यक्ष महिंदू यापा अबेयावर्दने यांनी सांगितले. हे अधिवेशन १७ मेपासून होण्याचे नियोजित आहे, मात्र सध्या पंतप्रधान किंवा सरकार नसल्यामुळे अध्यक्षांना त्यापूर्वीच अधिवेशन बोलावावे लागेल, असे कायदे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 दरम्यान, शांततेने सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांविरुद्ध आपल्या समर्थकांना हिंसाचाराला प्रवृत्त केल्याबद्दल महिंदूा राजपक्षे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांचे नेते करत आहेत. या हिंसाचारात किमान आठ जण ठार व दोनशेहून अधिक लोक जखमी झाले होते, तसेच अनेक राजकीय नेत्यांची घरे जाळण्यात आली होती.

 सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने, कायदे मंडळात प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना गोताबया राजपक्षे भेटणार असल्याचे अध्यक्षीय कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. सभागृहाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यासाठी आपण स्वत: पक्षनेत्यांची बैठक बोलावली असल्याचे अध्यक्ष अबेयवर्दने म्हणाले.  राजपक्षे समर्थक टोळीने शांत निदर्शकांवर सोमवारी केलेल्या हल्ल्याचा तपास करण्याचा आदेश आपण गुन्हे विभागाला दिला असल्याचे पोलीस प्रमुख चंदन विक्रमरत्ने यांनी सांगितले.