सुसज्ज भोजनगृह, आलिशान वस्त्रप्रावरणे, महागडी ताटे-वाटय़ा, दिमतीला नम्र सेवक आणि जोडीला अप्रतिम स्वादाची व्यंजने.. असा सारा शाही थाट मांडण्यात आला होता. निमित्त होते एक ‘पाहुणा’ जेवायला येण्याचे. तो आला, जेवण अर्थातच जन्मोजन्मी लक्षात राहील असे रुचकर होते, घरची आणि दारची सगळी मंडळी तृप्त झाली. ज्यासाठी हा सगळा घाट घातला गेला ते उद्दिष्ट अगदी १०० टक्के सफल झाले. सगळे दृष्ट लागण्याजोगे झाले. फक्त एक छोटी गोष्ट घडली! पाहुणा स्वत: जेवलाच नाही. बाकी सगळे आपापल्या ताटांवर आडवा हात मारत होते तेव्हा हा घुटक्याघुटक्याने कोमट पाणी तेवढे पीत होता.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी खास रात्री भोजन आयोजित केले होते. मोजक्या, निवडक खाशांच्या उपस्थितीत हा भोजनसोहळा आयोजिण्यात आला होता. दीड तासाच्या या भोजनबैठकीतून उद्याच्या ‘औपचारिक’ चर्चेआधी सौहाद्र्र वातावरण तयार करणे, हा या पंक्तीचा मुख्य उद्देश होता. त्या दृष्टीनेच या भोजनबैठकीची मांडणीही तशीच करण्यात आली होती. सुमारे दीड तासाच्या या छोटेखानी जेवणावळीदरम्यान ओबामा आणि मोदी यांनी भरपूर गप्पा मारल्या. एकमेकांच्या आयुष्यातील लक्षणीय प्रसंग ऐकवले. अनेक मुद्दय़ांवर त्यांनी एकमेकांची मते जाणून घेतली. ख्यालीखुशाली विचारली; पण या सगळ्यात मोदी यांनी कोमट पाण्याशिवाय अन्य काहीही घेतले नाही. नवरात्रीच्या उपासादरम्यान फक्त पाणी पिण्याचे ४० वर्षांचे व्रत त्यांनी जगातील सगळ्यात शक्तिशाली देशाच्या प्रमुखाच्या घरातही सोडले नाही. तत्पूर्वी, सोमवारी संध्याकाळी मोदी विशेष विमानाने वॉशिंग्टनला पोहोचले. अमेरिकी अध्यक्षांच्या ‘ब्लेअर हाऊस’ या खास अतिथिगृहात त्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री जेवणासाठी मोदी व्हाइट हाऊसमध्ये प्रवेशले त्या वेळी ओबामा यांनी ‘केम छो!’ अशी घरगुती पृच्छा करून त्यांचे स्वागत केले. त्यावर ‘थँक यू, प्रेसिडेंट’ असे म्हणत त्यांनी ओबामा यांचे आभार मानले. जेवणाच्या टेबलवर रीतीप्रमाणे मोदी यांच्यासमोरही ताट मांडले गेले; परंतु मोदी फक्त कोमट पाणी प्यायले. या वेळी अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन, परराष्ट्रमंत्री विल्यम बर्न्स, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राइस, तर भारतातर्फे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, परराष्ट्र सचिव सुजातसिंग, भारताचे अमेरिकेतील राजदूत एस. जयशंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ओबामांना गांधीजींची गीता
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खास भेट मिळाली. खादीच्या वस्त्रामध्ये गुंडाळलेली ‘गांधीजी की नजर से गीता’ हे पुस्तक आणि मार्टिन ल्युथर किंग यांच्या भारतभेटीसंदर्भातील दृक्श्राव्य चित्रफीत मोदींकडून ओबामांना मिळाली. महात्मा गांधी यांनी भगवद्गीतचे पुस्तकरूपी विवेचन केले होते, त्याची विशेष आवृत्ती ओबामांना देण्यात आली. मार्टिन ल्युथर किंग हे १९५९मध्ये भारतात आले होते, त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाची चित्रफीत मोदींनी ‘ऑल इंडिया रेडिओ’कडून मागविली होती.
‘केम छो,’ मोदी!
‘केम छो, मि. मोदी.’ अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाइट हाऊसच्या प्रवेशद्वारात ‘गुजराती’ स्वागत केले. त्यानंतर मोदींच्या स्वागतासाठी व्हाइट हाऊसमध्ये भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडविण्यात आले. मोदींसाठी ‘गरबा’ नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.
गांधीजींच्या पुतळय़ाला अभिवादन
वॉशिंग्टनमध्ये असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले. यावेळी मोदींसह परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी गांधीजींच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केला. अमेरिकेतील भारतीय वंशाचे अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.