नवी दिल्ली : भारतीय भूमीत लोकशाही केवळ रुजली नाही, तर ती समृद्धही झाली. आपल्या लोकशाहीबद्दल शंका घेणाऱ्यांचे अंदाज आपण भारतीयांनी खोटे ठरवले, असे स्पष्ट करीत राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, ‘‘लोकशाहीची अस्सल क्षमता शोधण्यासाठी जगाला मदत केल्याचे श्रेय भारताकडे जाते’’, असे प्रतिपादन केले.

 देशाचा विकास अधिक सर्वसमावेशक होत असून प्रादेशिक भेदभावही कमी होत आहेत. दलित, गरजू आणि उपेक्षितांच्याप्रति करुणा हा आजच्या भारताचा ‘परवलीचा शब्द’ बनला आहे, असेही राष्ट्रपती मूर्मु यांनी नमूद केले.

लैंगिक भेदभाव कमी होत असल्याचा दावाही राष्ट्रपतींनी भाषणात केला. महिला त्यांना प्रतिबंध करणाऱ्या अनेक अडथळय़ांवर मात करीत आहेत. आमच्या मुली देशासाठी सर्वात मोठी आशा आहे, असेही त्या म्हणाल्या.

अलीकडच्या वर्षांत विशेषत: करोना साथीच्या उद्रेकानंतर जगाने नव्या भारताचा उदय होताना पाहिला आहे. जागतिक मंदीला मागे टाकण्याचे आणि अर्थव्यवस्थेच्या भरभराटीस मदत करण्याचे श्रेय घेण्यास सरकार आणि धोरणकर्ते पात्र ठरतात. देशाचा विकास अधिक सर्वसमावेशकरीत्या होत असून प्रादेशिक भेदभावही कमी होत आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

सध्या टीकेचा विषय ठरलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरही मुर्मू यांनी भाष्य केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश भावी पिढीला औद्योगिक क्रांतीच्या पुढच्या टप्प्यासाठी सज्ज करणे आणि पुन्हा भारताच्या उज्ज्वल वारशाशी जोडणे, हा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपती म्हणाल्या की, जेव्हा देशाने स्वातंत्र्य मिळवले तेव्हा अनेक आंतरराष्ट्रीय नेते आणि तज्ज्ञांना त्यावेळी गरिबी आणि निरक्षरतेमुळे भारतातील लोकशाहीबद्दल साशंक होते. परंतु आम्ही भारतीयांनी त्यांचे अंदाज चुकीचे होते, हे सिद्ध केले.