पीटीआय, नवी दिल्ली
‘‘प्रश्नपत्रकिा फुटींचे प्रकार आणि अनुचित मार्ग पूर्णपणे रोखण्यासाठी केंद्र सरकार सार्वजनिक परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वंकष पावले उचलत आहे,’’ असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी सांगितले. ‘नीट-यूजी’ परीक्षेची प्रश्नपत्रकिा फुटल्यापासून विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता वाढीला लागली असून व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी विद्यार्थी ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह केली जाईल, असे आश्वासन मुर्मू यांनी विद्यार्थी आणि तरुणांना दिले.
देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण करताना राष्ट्रपतींनी विद्यार्थी हे भारताच्या भविष्याचे रचनाकार आहेत, असे नमूद केले. राष्ट्रीय सुरक्षा कायम राखण्यासाठी सरकार आणि समाज एकत्र आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येकाने विद्यमान व भविष्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संयुक्त आणि एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. तसेच तरुण आता रोजगारनिर्मिती करत आहेत, असे म्हणत त्यांनी तरुणाच्या उद्यमशीलतेचेही कौतुक केले. अनेक तरुण आता नोकर्या मागण्याऐवजी स्वतः नोकर्यांची निर्मिती करत आहेत, असे मुर्मू म्हणाल्या.
भाषणापूर्वी संपूर्ण ‘वंदे मातरम’
राष्ट्रपतींच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केल्या जाणार्या भाषणापूर्वी आणि नंतर पहिल्यांदाच ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत संपूर्ण स्वरूपात वाजवले गेले. त्यानंतर राष्ट्रगीत जन गण मन वाजवले गेले. भाषणातही राष्ट्रपतींनी या गीताने स्वातंत्र्य चळवळीत बजावलेल्या भूमिकेचे स्मरण केले.
सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था
पश्चिम आशियातील युद्ध आणि अस्थिरतेमुळे जगातील अनेक देशाच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होत असतानाही भारत आर्थिकदृष्ट्या भक्कमपणे पुढे आहे. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताची वाटचाल जोमाने सुरू आहे. भारताचा आर्थिक विकासदर जागतिक सरासरीच्या दुपटीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले.
देशाच्या सुरक्षेवर भर
भाषणात राष्ट्रपतींनी कारगील विजय दिवस, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि नक्षलवादविरोधी मोहिमेची प्रशंसा केली. त्याबरोबरच धोरणात्मक निर्णय म्हणून सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याच्या निर्णयाचे ‘निर्णायक पाऊल’ असे वर्णन केले.
अनेक तरुण स्वयंरोजगाराच्या मार्गावर वाटचाल करत असताना रोजगारनिर्मितीची संस्कृती आपलीशी करत आहेत. तरुण उद्यमींच्या सहभागामुळे आपल्या देशात स्टार्टअपचे मजबूत जाळे निर्माण झाले आहे. भारतीय तरुणांची प्रतिभा आणि समर्पण यामुळे प्रमुख जागतिक उद्योग प्रभावित झाले आहेत. – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
