First Woman Army Officer President ADC Navya Shekawat: राष्ट्रपती भवनातील विविध अधिकृत समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समवेत वावरणाऱ्या एका तरुण लष्करी महिला अधिकाऱ्याने सध्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या अधिकारी आहेत मेजर नव्या शेखावत. मेजर शेखावत यांची राष्ट्रपतींच्या ‘एड्-डी-कँम्प’ (ADC) पदी नियुक्ती झाली असून हे अत्यंत प्रतिष्ठेचे पद भूषवणाऱ्या त्या भारतीय लष्करातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
‘एडी-द-कॅम्प’ची जबाबदारी नेमकी काय असते?
हे पद औपचारिक वाटत असले तरी राष्ट्रपतींच्या ‘एड्-डी-कँम्प’ची भूमिका केवळ सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती यांच्यासमवेत राहण्यापुरती मर्यादित नसते. परंपरेनुसार राष्ट्रपतींच्या ताफ्यात एकूण पाच एडीसी असतात. यामध्ये लष्करातील तीन, तर नौदल आणि हवाई दलातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश असतो. राष्ट्रपतींच्या अधिकृत दौऱ्यांचे व्यवस्थापन, विविध कार्यक्रमांमधील समन्वय आणि लष्करी शिष्टाचार तसेच प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्याचे अत्यंत संवेदनशील काम या अधिकाऱ्यांवर सोपवलेले असते.
सीडीएस परीक्षेतून लष्करातील प्रवासाला सुरुवात
लष्करात दाखल होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशातील इतर तरुणांप्रमाणेच मेजर नव्या शेखावत यांचा प्रवासही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेतून सुरू झाला. ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन वुमन नॉन-टेक्निकल कोर्स’च्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्यानंतर त्यांनी चेन्नई येथील ‘ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी’तून आपले खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले.
प्रशिक्षणानंतर शेखावत यांची ‘आर्मी सर्व्हिस कोअर’मध्ये नियुक्ती झाली. ही कोअर सैन्याला लागणाऱ्या रसद, वाहतूक आणि पुरवठा साखळीच्या अत्यंत महत्त्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळते. २०२१ च्या मध्यावर लष्करात दाखल झालेल्या नव्या शेखावत यांनी अल्पावधीतच मेजर पदापर्यंत मजल मारली. सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत त्यांची राष्ट्रपतींच्या एडीसी पदी निवड झाली आहे.
राष्ट्रपतींच्या ताफ्यातील दुसऱ्या महिला अधिकारी
लष्करातून पहिल्या महिला एडीसी होण्याचा मान मेजर शेखावत यांना मिळाला असला, तरी एकंदरीत संरक्षण दलांचा विचार करता त्या दुसऱ्या महिला एडीसी ठरल्या आहेत. २०२५ मध्ये भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी यांची राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला एडीसी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता मेजर शेखावत यांच्या रूपाने लष्करातील पहिल्या महिला अधिकाऱ्याचा राष्ट्रपतींच्या ताफ्यात समावेश झाला आहे.
मेजर ऋषभ सिंह सांब्याल एडीसी पदावरून निवृत्त
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे एड्-डी-कँम्प म्हणून सेवा बजावलेले मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी १२ वर्षांच्या सेवेनंतर मुदतपूर्व निवृत्ती घेतली. “माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण निर्णय आहे. मला काही कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागणार आहेत. हा निर्णय घ्यावा लागेल असा मी कधी विचारही केला नव्हता. खूप वेदनादायी होतं. निर्णय जाहीर करण्यासाठी खूप वेळ लागला,” असे सांब्याल यांनी ‘द प्रिंट’शी बोलताना सांगितले.
सांब्याल हे सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध होते. त्यांचे रिल्स अनेकदा व्हायरल होत असत. त्यांना सोशल मीडियावर नॅशनल क्रश म्हणून संबोधले जात असे.
