राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा नायनाट करण्याच्या आपल्या निर्धारावर देश ठाम असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारी या हल्ल्याला एक वर्षे पूर्ण झाले.
‘या अत्यंत घृणास्पद कृत्यात निष्पाप जीवांचे गेलेले बळी आपल्या स्मृतीमध्ये कायम कोरलेले आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा दहशतवादी कारवाया शांतता आणि एकतेप्रती असलेल्या आमच्या अढळ वचनबद्धतेला डळमळीत करू शकत नाहीत’, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘एक्स’वर म्हटले.
दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही : मोदी
भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही आणि दहशतवाद्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले. ‘एक राष्ट्र म्हणून, आपण या दुःखाच्या प्रसंगी आणि आपल्या संकल्पाच्या बाबतीत एकजुटीने उभे आहोत. गेल्या वर्षी याच दिवशी घडलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप जीवांचे स्मरण करत आहे. त्यांना कधीही विसरणार नाही,’ असे मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
भारताची अस्मिता अभेद्य : खरगे
दहशतवादाच्या प्रत्येक कृत्याविरुद्ध भारताची अस्मिता अभेद्य आणि एकजूट म्हणून उभी आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. ‘२०२५ मध्ये याच दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या २६ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. देश या निष्पाप नागरिकांच्या बलिदानाला कधीही विसरणार नाही किंवा त्यांची उपेक्षा करणार नाही. ज्या शोकाकुल कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याबरोबर आमच्या संवेदना’, अशा भावना खरगे यांनी ‘एक्स’वर व्यक्त केल्या.
काश्मीरभर सुरक्षा व्यवस्थेत वाढ
श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त, पीडितांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रम आणि रॅली आयोजित केल्या जाण्याची शक्यता लक्षात घेऊन, पोलीस आणि निमलष्करी दले काश्मीरमधील पर्यटन स्थळांसह महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
