राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावरून राजकारण पेटले आहे. शनिवारी (७ मार्च) राष्ट्रपती पश्चिम बंगालमध्ये आदिवासी समाजाच्या परिषदेसाठी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी पश्चिम बंगाल सरकारमधील कोणीही उपस्थिती नव्हते. यावरून द्रौपदी मुर्मू यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सचिवांनी पश्चिम बंगालच्या सचिवांना नोटीस पाठवली आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी ‘ब्ल्यू बुक’ तसेच प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. बॅनर्जी यांनीदेखील टीकांना प्रत्युत्तर दिले. ‘ब्ल्यू बुक’ नेमकं काय आहे? तसेच पश्चिम बंगालमध्ये काय घडले? त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पश्चिम बंगाल दौरा वादग्रस्त
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी (७ मार्च) पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री अथवा इतर मंत्री यांपैकी कोणीही उपस्थित नव्हते. त्याबाबत द्रौपदी मुर्मू यांनी नाराजी व्यक्त केली होती. आदिवासी समाजाच्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत उपस्थित राहण्यासाठी द्रौपदी मुर्मू पश्चिम बंगालमध्ये गेल्या होत्या. पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्याचे प्रमुख पोलीस अधिकारी यांना ‘ब्ल्यू बुक’ची पुर्तता करावी लागते. परंतु, राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी ‘ब्ल्यू बुक’ संबंधित नियमावलींचे उल्लंघन झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेत पश्चिम बंगालच्या सचिवांना नोटीस देखील बजावली आहे.
राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांनी जाणे बंधनकारक आहे का?
राष्ट्रपती एखाद्या राज्याच्या दौऱ्यावर येत असल्यास त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणे संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यासाठी बंधनकारक नाही. परंतु, राष्ट्रपती पदाचा मान राखत मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी स्वत: उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांनी इतर मंत्र्याला नामनिर्देशित करणे अपेक्षित आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या स्वागताला मुख्यमंत्री अनुपस्थितीत राहिल्याचे यापूर्वी अनेकदा घडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्यपाल किंवा मंत्री यांनी त्यांचे स्वागत केले. परंतु, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी एकाही मंत्र्याला न पाठवणे हे पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच घडले आहे.
‘ब्ल्यू बुक’ काय आहे? त्यात नेमकं काय असते? (What is Blue Book)
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी केलेली विशेष व्यवस्था, कार्यक्रमाचे ठिकाण, त्याठिकाणी पोहचण्याचा मार्ग याबाबत ‘ब्ल्यू बुक’मध्ये नोंद केली जाते. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘ब्ल्यू बुक’ वेळोवेळी अद्यायावत केली जाते. दौऱ्याशी संबंधित सर्व विभागांना ही बुक पाठवली जाते. जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याकडे या ‘ब्ल्यू बुक’ची प्रत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पाठवली जाते. दरम्यान, ‘ब्ल्यू बुक’ संबंधित बाबींची पूर्तता करणे अत्यावश्यक असते. त्यात त्रुटी आढळल्यास केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अनेक स्तरांवर चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २०२१ मधील पश्चिम बंगाल दौऱ्यात काय घडले होते?
‘ब्ल्यू बुक’मध्ये नोंद केलेल्या माजी अधिकाऱ्यांनी याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती दिली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान एखाद्या राज्याच्या दौऱ्यावर येत असल्यास त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्यपालांनी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहायला हवे. जर त्यांना शक्य नसेल, तर राज्य सरकारने एखाद्या मंत्र्याला स्वागतासाठी पाठवणे आवश्यक असते. याबाबत राज्य सरकारला संबंधित (राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान) कार्यालयाला आधीच माहिती द्यावी लागते. पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी असे कधीही घडले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मे, २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांचा दौरा हा वादग्रस्त ठरला होता. परंतु, तरीदेखील ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर आल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये वादळाने झालेल्या नुकसानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक घेतली होती. त्या बैठकीला मात्र ममता बॅनर्जी अनुपस्थित राहिल्या होत्या.
राष्ट्रपतींच्या स्वागताला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अन् राज्यपाल दोघेही अनुपस्थित
अलिकडेच मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उत्तर प्रदेशातील मथुरा येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोघेही अनुपस्थित होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांना मुर्मू यांच्या स्वागतासाठी पाठवले होते. दरम्यान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या कार्यालयाला त्यांच्या स्वागतासाठी कोण उपस्थित राहणार, याबाबत राज्यांना आधीच माहिती द्यावी लागते.
अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना पंतप्रधानांचे स्वागत कसे व्हायचे?
समाजवादी पक्षाचे सरकार असताना उत्तर प्रदेशात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘व्हिआयपीं’च्या दौऱ्यांबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती दिली. “नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. मार्च २०१७ पर्यंत अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. या दरम्यान मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना जेव्हा जेव्हा शक्य नव्हते, तेव्हा त्यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी इतर मंत्र्यांना पाठवले होते. प्रणव मुखर्जींच्या दौऱ्यांबाबतही अखिलेश यांनी हीच पद्धत कायम ठेवली होती.”
ममता बॅनर्जी राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर काय म्हणाल्या?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा कार्यक्रम हा पश्चिम बंगाल सरकारने आयोजित केला नव्हता, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. त्या म्हणाल्या, “राष्ट्रपतींचा कार्यक्रम एका खासगी संस्थेने आयोजित केला होता. तो राज्य सरकारने आयोजित केला नव्हता. मी त्याबाबत माझ्या सोशल मिडिया हॅण्डलवर प्रतिक्रिया दिली आहे. खासगी संस्था कार्यक्रमाचे नियोजन करण्यास सक्षम नाही, हे आम्ही सांगितले होते. परंतु, तरीही राष्ट्रपतींनी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने भाजपा पश्चिम बंगालला लक्ष्य करत आहे”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
