नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित एका सोहळ्यामध्ये पद्म पुरस्करांचे वितरण केले. वर्ष २०२६ साठी पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांसह एकुण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

सोमवारी पार पडलेल्या समारंभात कला क्षेत्रातील असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (मरणोत्तर), शास्त्रीय संगीतकार व व्हायोलिन वादक एन. राजम यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी, ‘अवधान’ या प्राचीन भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करणारे प्रख्यात विद्वान शतावाधानी आर. गणेश, कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय सुरेश कुमार कोटक आणि जठर-आतडेतज्ज्ञ कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पीयूष पांडे आणि माजी खासदार विजय कुमार मल्होत्रा यांना ही पद्मभूषण (मरणोत्तर) प्रदान करण्यात आले.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, अभिनेते प्रोसेनजित चॅटर्जी, पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे माजी महासंचालक के. विजय कुमार यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. या समारंभाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.