राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रीय सुरक्षा, सिंधू जल करार, परराष्ट्र धोरण, विद्यार्थ्यांची निदर्शने, भारतातील शेतकऱ्यांचं हित, दहशतवादाचा मुद्दा अशा अनेक विषयांवर महत्वाचं भाष्य केलं आहे. तसेच नागरिकांनी राष्ट्रासाठी नेहमी जागरूक राहिलं पाहिजे, असं आवाहनही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केलं आहे.
नीट परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळानंतर देशभरात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाष्य करत विद्यार्थ्यांचा भारताच्या भविष्याचे शिल्पकार असा उल्लेख केला. ज्याप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार आणि समाजाने एकजूट राहणं आवश्यक आहे, त्याप्रमाणेच आपल्या विद्यार्थ्यांचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे, असं द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काय म्हणाल्या?
“सार्वजनिक परीक्षा या आपल्या विद्यार्थ्यांसाठी संधी असतात. सरकारच्या विविध उपक्रमांमुळे आणि नव्याने सुरू होत असलेल्या आर्थिक घडामोडींमुळे तरुणांसाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होत आहेत. या नवीन संधींचा शोध घेऊन आणि त्यांचा लाभ घेऊन आपले तरुण यशाच्या नव्या टप्प्यांवर वाटचाल करू शकतात”, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपतींनी ऑपरेशन सिंदूरचा केला उल्लेख
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला भारताने लष्करी प्रत्युत्तर दिलं होतं. त्या ऑपरेशन सिंदूरबाबत राष्ट्रपती म्हणाल्या की, “ऑपरेशन सिंदूरच्या मोहिमेने दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना एक स्पष्ट व कठोर संदेश गेला की, ते कुठेही लपले तरी त्यांना त्यांच्या कृत्यांचे परिणाम भोगावेच लागतील.”
सिंधू जल कराराबाबत राष्ट्रपती काय म्हणाल्या?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला होता. या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं की, “दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशाबरोबरचा सिंधू जल करार स्थगित करणं हे आपल्या राष्ट्राच्या आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेलं एक निर्णायक पाऊल आहे.”
भारतीय अर्थव्यवस्था आणि डिजिटल व्यवहार
“भारताने जगातील सर्वात मोठी व सर्वोत्तम डिजिटल पायाभूत सुविधा विकसित केली. आता ग्रामीण भागातील दुकानांमध्येही आणि रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांमध्येही डिजिटल व्यवहार सामान्य झाले आहेत. जगातील निम्म्याहून अधिक रिअल-टाइम डिजिटल व्यवहार भारतात होतात. आर्थिक अंदाजांनुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर जागतिक सरासरी विकासदराच्या दुप्पट असण्याची शक्यता आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाने आपल्या आर्थिक प्रगतीचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा पाया अधिक बळकट केला”, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय हित आपल्या परराष्ट्र धोरणाचा पाया
“राष्ट्रीय हित हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा पाया आहे. शांतता, सहकार्य, संवाद आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’चा आदर्श हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे आधारस्तंभ आहेत. आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी आणि परस्पर संबंध दृढ करण्यासाठी भारताने अनेक देशांशी मुक्त व्यापार करार केले आहेत”, असंही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.
