Mahashivratri 2023: महाशिवरात्रीचा सण भारतभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. देशातील विविध प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शंकराची उपासना केली जाते. शैव परंपरेतील अनुयायांसाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण सण असतो. या दिवशी भक्तजण उपवास करतात. मंदिरांमध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा करत त्यावर जल, पंचामृत अर्पण करतात. काही ठिकाणी हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. भारतामधील १२ ज्योतिर्लिंग देवस्थानांना महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक मोठ्या संस्थेने गर्दी करतात. शिव आणि पार्वती यांचा विवाह या तिथीला झाला असल्याचेही म्हटले जाते. त्यामुळे हा सण अधिक महत्त्वपूर्ण समजला जातो. आध्यात्मिक गुरु सद्गुरु यांनी १९९२ मध्ये ईशा फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्रीच्या उत्सवाचे आयोजन केले जाते. या संस्थेच्या ईशा योगी सेंटरजवळ असणाऱ्या आदियोगी या भगवान शंकराच्या भव्य मूर्तीच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम पार पाडला जातो. यंदाच्या महाशिवरात्रीच्या उत्सवाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकरिता ईशा योगा सेंटरद्वारे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतरचा द्रौपदी मुर्मू यांचा हा पहिला तामिळनाडू दौरा आहे. महाशिवरात्री व अन्य महिन्यातील शिवरात्री यांच्यात आहे ‘हा’ मोठा फरक; ज्योतिष तज्ज्ञ सांगतात, “याच दिवशी..” ईशा योगा सेंटरने आयोजित केलेला महाशिवरात्रीचा उत्सव सायंकाळी सहा वाजता सुरु होणार असून त्याची सांगता दुसऱ्या दिवशी १९ फेब्रुवारी (रविवार) होणार आहे. हा कार्यक्रम अनेक प्रसारण वाहिन्यांसह १६ भाषांमध्ये लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे. या तिथीनिमित्ताने योगा सेंटरला मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जमणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्सवाचा प्रारंभ पंच भूतांच्या आराधनेने होणार आहे. त्यानंतर ईशा महाशिवरात्र लिंग भैरवी महायात्रा, सद्गुरु प्रवचन, मध्यरात्री ध्यानसाधना, आदियोगी दिव्य दर्शन असे या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळीदेखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.