कोलंबो : श्रीलंकेतील आजवरचे सर्वात भीषण आर्थिक संकट हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल सरकारने तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी होत असतानाच, राजकीय पक्षांनी आपले सर्व मतभेद बाजूला ठेवावेत असे आवाहन अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी केले. याच वेळी, ‘लोकाभिमुख लढा’ सुरू करण्यासाठी एकत्रित यावे, असे आवाहन त्यांनी आंदोलक नागरिकांना केले.

 देशातील राजकीय व आर्थिक संकट सोडवण्याच्या उद्देशाने मार्ग मोकळा करण्याकरिता गोताबया यांचे मोठे भाऊ व पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांनी राजीनामा न दिल्यास, सर्व राजकीय नेत्यांना नाकारण्यासाठी सर्व लोकांवर प्रभाव टाकण्यात येईल असा इशारा देशातील एका शक्तिशाली बौद्ध धर्मगुरूने दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोताबया यांनी हा संदेश दिला.

 ‘लोकांच्या वतीने सहमती साधण्याचे आवाहन मी पुन्हा एकदा मी सर्व राजकीय पक्षांना करतो. सर्व राजकीय मतभेद दूर ठेवून लोकाभिमुख लढा सुरू करण्यासाठी लोकांनी एकत्र यावे अशीही माझी प्रामाणिक इच्छा आहे,’ असे ट्वीट गोताबया यांनी केले.

अध्यक्ष गोताबया व पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी गुरुवारी सुमारे १ हजार कामगार संघटनांनी एक दिवसाचा देशव्यापी संप केला होता.