scorecardresearch

करोनाकाळातही अर्थव्यवस्था वेगवान : राष्ट्रपती

भारताला सर्वोच्च ५० नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळाले आहे, असे कौतुकोद्गार कोविंद यांनी काढले.

नवी दिल्ली : करोनाचे संकट कायम असले तरी, गेल्या वर्षीच्या आकुंचनातून बाहेर येत देशाची अर्थव्यवस्था यावर्षी वेगाने विकास साधेल, असा आशावाद राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात व्यक्त केला.

करोनाचा विषाणू उत्परिवर्तित होत असून या संकटावर मात करेपर्यंत निष्काळजीपणा करू नका, मुखपट्टीचा वापर, अंतरनियम पाळा, असे आवाहनही कोविंद यांनी केले.

दोन वर्षांत करोनामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला होता़  मात्र, गेल्या वर्षी सुरू केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला यश मिळू लागले आहे. कृषी व उत्पादन क्षेत्रातील सुधारणांमुळे प्रभावी आर्थिक कामगिरी करणे शक्य झाले आहे. छोटे शेतकरी उत्साहाने नैसर्गिक शेती करू लागले आहेत. लघू आणि मध्यम उद्योगांनी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कल्पक तरुण उद्योजकांनी नवउद्योगांसाठी (स्टार्ट-अप) पोषक वातावरण निर्माण केले आहे. भारताला सर्वोच्च ५० नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळाले आहे, असे कौतुकोद्गार कोविंद यांनी काढले.

अतुलनीय धैर्य..

राष्ट्रीय सेवेचे मूलभूत कर्तव्य पार पाडत कोटय़वधी लोकांनी स्वच्छ भारत मोहीम आणि करोना लसीकरण मोहिमेचे जनचळवळीत रूपांतर केले. अशा मोहिमा यशस्वी होण्याचे श्रेय कर्तव्यदक्ष नागरिकांना जाते, असेही कोिवद म्हणाले. लोकसंख्येच्या घनतेमुळे भारतात साथीच्या रोगाचे नियंत्रण अधिक कठीण होते. आपल्याकडे पुरेशी साधनसंपत्ती व पायाभूत सुविधा नाहीत. तरीही कोरोनाविरोधात अतुलनीय धैर्य दाखवत आपण आरोग्यसेवेतील पायाभूत सुविधांचा विकास केला. स्वदेशी लस विकसित केल्या. इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली. अन्य देशांनाही लस आणि इतर वैद्यकीय मदत देत आहोत. भारताच्या या योगदानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक केले जात आहे, असे उद्गार कोविंद यांनी काढले.

गावाची-देशाची सेवा करा!

गेल्या वर्षी मी कानपूर जिल्ह्यातील पारौंख या मूळगावी गेलो होतो. माझ्या गावाच्या आशीर्वादामुळे मी राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचू शकलो. मी जगात कुठेही असलो तरी माझे गाव आणि माझा देश माझ्या हृदयात राहतो. आपल्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेमुळे यशस्वी होतात, त्यांनी आपले मूळ, आपले गाव-शहर विसरू नये. आपल्या गावाची, आपल्या देशाची जमेल त्या मार्गाने सेवा करावी, अशी सूचना कोिवद यांनी केली. नौदल व कोचीन शिपयार्ड यांनी स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका ‘’आयएसी विक्रांत’’ तयार केली. अशा आधुनिक लष्करी क्षमतेमुळे भारताची गणना आता जगातील आघाडीच्या नौदलसमर्थ देशांमध्ये झाली आहे. हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-प्रेरित आदर्श ग्राम योजने’ अंतर्गत गावाचा कायापालट केल्याचेही पाहिले. ही स्वावलंबी उदाहरणे अनुकरणीय असल्याचे कोविंद म्हणाले.

गांधीजींचा कालातीत सल्ला!

महात्मा गांधीजी १९३० मध्ये म्हणाले होते की, आपण आपले ध्येय केवळ अहिंसक आणि सत्याच्या मार्गाने प्राप्त करू इच्छितो, आपण ते केवळ आत्मशुद्धीद्वारे करू शकतो. २६ जानेवारी हा दिवस रचनात्मक कार्यात घालवला पाहिजे. गांधीजींचा हा सल्ला कालातीत आहे, असे राष्ट्रपती कोिवद म्हणाले. संविधानाद्वारे लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूल्ये आपण स्वीकारली आणि त्याआधारावर भारताचे प्रजासत्ताक उभे राहिले, असे कोविंद म्हणाले.

लष्करात महिलांचा वाढता सहभाग

देशाच्या संरक्षण दलाचे तत्कालीन प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूबद्दल राष्ट्रपती कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले व रावत यांना आदरांजली वाहिली. देशभक्ती नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना बळकट करते. तुम्ही डॉक्टर असो वा वकील, दुकानदार असो वा कार्यालयीन कर्मचारी, सफाई कर्मचारी असो वा मजूर असो, आपले कर्तव्य चोखपणे आणि कार्यक्षमतेने करणे हेच योगदान असते, असे ते म्हणाले. सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग वाढत असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे, असेही कोविंद म्हणाले.  

आझादी का अमृत महोत्सव

देशाला या वर्षी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने साजरा होत असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या विविध कार्यक्रमांमध्ये तरुण उत्साहाने सहभागी होत आहेत. तरुण पिढीच नव्हे तर, सर्वासाठी देशाच्या भूतकाळाशी पुन्हा जोडण्याची ही उत्तम संधी आहे. स्वातंत्र्यलढा हा आपल्या वैभवशाली गाथेतील प्रेरणादायी अध्याय होता. स्वातंत्र्याच्या या ७५ व्या वर्षांत, आपल्या गौरवशाली राष्ट्रीय चळवळीला चालना देणारी मूल्ये नव्याने शोधली पाहिजेत, असे कोविंद म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: President kovind addresses nation on eve of 73rd republic day zws

ताज्या बातम्या