संपूर्ण देशात आज (बुधवारी) बकरी ईद साजरी केली जात आहे. त्या निमित्ताने दिल्लीच्या जामा मशिदीत आज सकाळी ईदचं नमाज पठण करण्यात आलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.राष्ट्रपतींनी हिंदी, उर्दू आणि इंग्रजी अशा तिनही भाषांमध्ये ट्विट करत शुभेच्छा दिल्या.

आजच्या दिवशी आपल्या समाजातील सहानुभूती आणि बंधुभावाची भावना वाढेल अशी अपेक्षा बाळगतो, ‘ईद उल जुहा’ च्या शुभेच्छा असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. तर देशवासियांना विशेषतः मुस्लीम बांधवांना ‘ईद उल जुहा’ च्या शुभेच्छा. आपल्या समाजात एकता आणि बंधुभाव टिकवण्यासाठी एकत्र मिळून काम करु असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं.

जाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व –
रमजान ईदनंतर बरोबर ७० दिवसांनी येणारा बकरी ईद हा दिवस मुस्लिम धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रमजान ईदनंतरचा मोठा सण म्हणून हा दिवस ओळखला जातो. मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण करतात तसेच एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छाही दिल्या जातात. यादिवशी घरोघरी शेवया, मिठाई आणि पक्वान्न बनवली जातात आणि कुटुंबातील मंडळी एकत्र मिळून याचा आस्वाद घेतात. या दिवशी बकरीचा बळी देण्याची प्रथा मागील अनेक वर्षांपासून आहे. आता बकरीचा बळी का दिला जातो? तर त्यामागे एक गोष्ट सांगितली जाते.
हजरत इब्राहिम यांना देवाने आपल्या मुलाचा बळी देण्यास सांगितले. देवाने सांगितले असल्याने तेही ही गोष्ट करण्यास तयार झाले होते. या मुलाचे नाव इस्माईल असे होते. पोटचा मुलगा असल्याने इब्राहिम यांना तो अतिशय लाडका होता. पण देवाचा आदेश पाळणे गरजेचे असल्याने त्यांनी ही अतिशय कठीण गोष्ट मान्य केली. आपल्या मुलाचा बळी देण्यास तयार झालेल्या हजरत इब्राहिम यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हातात सुरा देण्यात आला. मात्र त्याचवेळी देवाने त्यांना खुश करायचे ठरवले. आणि प्रत्यक्ष बळी देण्याच्या वेळी मुलाच्या जागी एक बकरा आणून ठेवला. देवाच्या या कृतीमुळे इब्राहिम देवावर खूपच खुश झाला. कारण आपला मुलगा त्याला कायमसाठी मिळणार होता. त्यामुळे तेव्हापासून या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो.
मुस्लिम समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांसाठी बकरा कापणे अनिवार्य आहे. यातही हा कापलेला बकरा केवळ आपल्या कुटुंबात वाटून न खाता तो समाजातील गरिब वर्गाला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी गरिबांची विशेष काळजी घेतली जाते. बळी दिलेल्या बकऱ्याचा मांसाचे तीन भाग केले जातात. त्यामध्ये गरिब, गरजवंत आणि स्वत: असे हे मांस वाटले जाते. देवाचा आदेश मानून हा बळी दिला जातो आणि कुटुंबिय एकत्रितपणे त्याचे मांस खातात.