रशिया युक्रेन युद्ध गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु आहे. मात्र या युद्धात अजूनही रशियाला यश मिळालेलं नाही. २४ एप्रिल २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला होता. तेव्हापासून आतापर्यंत या युद्धाचा निकाल लागलेला नाही. असं असताना बलाढ्य रशिया आपला ७७ वा विजय दिवस साजरा करत आहे. या दिवशी रशियाने दुसऱ्या महायुद्धात विजयाची घोषणा केली होती. सोमवारी ७७ व्या विजय दिनाला संबोधित करताना, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील रशियाच्या कृतीची तुलना दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत लढाईशी केली. युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाई ही पाश्चात्य देशांच्या धोरणांना योग्य वेळी दिलेली योग्य प्रतिक्रिया आहे, असे ते म्हणाले. रशिया युक्रेनमध्ये आपल्या मातृभूमीचे रक्षण करत आहे. जगात पुन्हा युद्ध होऊ नये यासाठी सर्व काही करणे ही आपली जबाबदारी आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं. युक्रेन युद्धात शहीद झालेल्या रशियन सैनिकांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

“नाटो आमच्या सीमेवर रशियाला धोका निर्माण करत आहे. युक्रेनमधील रशियन सैन्याला पूर्णपणे अस्वीकार्य धोक्याचा सामना करावा लागत आहे. आम्ही आमच्या भूमीसाठी लढत आहोत. युक्रेन अण्वस्त्रांच्या दिशेने वाटचाल करत आहे. हिटलरप्रमाणे रशिया युक्रेनला युद्धात पराभूत करेल अशी शपथ आम्ही घेतली आहे. या युद्धात विजय आमचाच असेल.”, असं व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

रशिया ९ मे रोजी रशियाचा विजय दिवस परेड साजरा करत आहे. या दिवशी दुसऱ्या महायुद्धात रशियाने हिटलरच्या नाझी सैन्याचा पराभव केला. नाझी जर्मनीचे बिनशर्त आत्मसमर्पण या दिवशी रात्री ११ वाजून १ मिनिटांनी झाले. रशियन युद्धाला १९४१-४५ चे महान देशभक्तीपर युद्ध संबोधलं जातं.