गलवान खोऱ्यातील योद्धय़ांचा गौरव ; बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात समोरासमोर झालेल्या संघर्षांत भारताचे २१ जवान हुतात्मा झाले होते.

हुतात्मा बी. संतोष बाबू यांची पत्नी बी. संतोषी व आई मंजुला यांनी मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महावीर चक्र पुरस्कार स्वीकारला.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी जूनमध्ये पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी हल्ल्याला निधडय़ा छातीने तोंड देणारे १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू यांचा मंगळवारी मरणोत्तर महावीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला. समोरासमोर झालेल्या लढाईत अतुलनीय धैर्य दाखवल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

बाबू यांची पत्नी बी. संतोषी व आई मंजुला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि देशाचे उच्चपदस्थ लष्करी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. परमवीर चक्रानंतर महावीर चक्र हा युद्धकाळातील दुसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे.

गेल्या वर्षी १५ जूनला गलवान खोऱ्यातील संघर्षांत चिनी फौजांशी लढताना प्राणांचे बलिदान करणाऱ्या नायब सुबेदार नुडुराम सोरेन, हवालदार (गनर) के. पलानी, नाईक दीपक सिंह आणि शिपाई गुरतेज सिंग या इतर चार सैनिकांना मरणोत्तर वीरचक्र पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले आहे.

गलवान खोऱ्यातील चकमकीच्या वेळी भारतीय लष्कराच्या पथकाचा भाग असलेला आणि चकमकीत बचावलेला ३ मिडियम रेजिमेंटचा हवालदार तेजिंदर सिंग यालाही वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वीरचक्र हा देशाचा युद्धकाळातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे.

नुडुराम सोरेनची पत्नी लक्ष्मी मणी सोरेन, हवालदार पलानीची पत्नी वनती देवी आणि दीपक सिंहची पत्नी रेखा सिंह यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. गुरतेज सिंगची आई प्रकाश कौर आणि वडील वरसा सिंग यांनी राष्ट्रपतींकडून वीरचक्र स्वीकारले.

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात समोरासमोर झालेल्या संघर्षांत भारताचे २१ जवान हुतात्मा झाले होते. गेल्या अनेक दशकांत दोन्ही देशांत झालेला हा सर्वात भीषण लष्करी संघर्ष होता. या चकमकीत गंभीर जखमी होऊनही आणि परिस्थिीती विपरीत असतानाही संपूर्ण नियंत्रण राखून कर्नल बाबू यांनी भारतीय फौजांचे आघाडीवर राहून नेतृत्व केले. भारतीय लष्कराने पूर्व लडाखमधील चौकी १२० येथे ‘गलवान योद्धय़ांसाठी’ स्मारक उभारले आहे. भारतीय लष्कराशी झालेल्या चकमकीत चिनी लष्कराचे ५ अधिकारी व सैनिक मारले गेल्याचे चीनने फेब्रुवारी महिन्यात अधिकृतरित्या मान्य केले. मात्र ही संख्या यापेक्षा जास्त असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: President ram nath kovind confers gallantry awards to galwan valley heroes zws

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या