भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली. त्यानंतर ते ट्विटर या सोशल मीडिया वेबसाईटवर आले. ही बातमी आम्ही करेपर्यंत ३२ लाख ८० हजार लोकांनी राष्ट्रपती रामानाथ कोविंद यांना ट्विटरवर फॉलो केलं आहे. रामनाथ कोविंद यांना फॉलो करणाऱ्या नेटिझन्सचा आकडा वाढतोच आहे. रामनाथ कोविंद यांनी मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाच फॉलो केलं आहे. नेत्यांनी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणं ही बाब भारताच्या परंपरेला काही नवी राहिलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अनेक नेते ट्विटरवर अॅक्टिव्ह आहेत. राष्ट्रपती भवनातर्फे हे ट्विटर हँडल @rashtrapatibhvn या नावाने सुरू करण्यात आलं आहे. या ट्विटर हँडलवर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हेदेखील अॅक्टिव्ह होते. आता या ट्विटर हँडलवर रामनाथ कोविंद येताच त्यांच्या फॉलोअर्समध्ये लाखोंची वाढ झाली आहे.

आपल्याला महात्मा गांधी आणि दीनदयाल उपाध्याय यांच्या स्वप्नातील भारत घडवायचा आहे. आम्ही सर्व एक असून एकच राहणार असल्याचे ते म्हणाले. विविधता ही आमच्या देशातील ताकद आहे. आज संपूर्ण जगात भारताचे महत्व वाढले आहे. संपूर्ण जग आमच्याकडे आशेने पाहत आहे, असे ते म्हणाले. देशातील आदिवासी जो आपल्या पर्यावरणाचे रक्षण करतो तोही एक राष्ट्र निर्माता असल्याचे ते म्हणाले. राष्ट्र निर्माणाचा आधार हा राष्ट्रीय गौरव असल्याचं रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार मीरा कुमार यांना हरवत रामनाथ कोविंद यांनी ६५.५ टक्के मतं मिळवली. आजच त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. त्यांची ट्विटरवर एंट्री होताच त्यांचे फॉलोअर्स लाखोंनी वाढले आहेत. रामनाथ कोविंद हे बिहारचे माजी राज्यपाल होते. दलित आणि मागास समाजाच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचलं आहे. आता देशाच्या सर्वोच्चपदी बसण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.