अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी आणि तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी तैपई येथील राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयामध्ये भेट घेतली. चीनचा विरोध झुगारून तैवानमध्ये नॅन्सी दाखल झाल्याने चीनने आक्रमक पवित्रा घेतला असतानाच आम्ही तैवानला एकटं सोडणार नाही असं आश्वासन नॅन्सी पलोसी यांनी अमेरिकेच्या वतीने दिलंय. आम्हाला तैवानसोबत असणाऱ्या मैत्रीचा सार्थ अभिमान आहे असंही नॅन्सी पलोसी यांनी म्हटलंय.

तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी नॅन्सी पलोसी यांनी देशाला भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. आमची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी आम्ही वाटेल ते करु असा शब्दही वेन यांनी अमेरिकेला दिलाय. “आम्हाला सातत्याने लष्करी कारवाईच्या धमक्या दिल्या जातात. मात्र तैवान यासमोर झुकणार नाही. आम्ही आमचे सर्वभौमत्व कायम राखण्यासाठी आणि देशातील लोकशाही कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू,” असंही त्साई इंग-वेन यांनी म्हटलंय. “जगभरातील सर्व लोकशाही देशांसोबत काम करत आम्हाला आमची लोकशाही मुल्यं जपाची आहेत,” असंही त्साई इंग-वेन यांनी म्हटलंय.

त्साई इंग-वेन यांनी आपण शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी कटीबद्ध असल्याचं म्हटलंय. जागतिक व्यापारामध्ये तैवानला सर्वात स्थीर आणि सुरक्षित देश बनवण्याचा निर्धार देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला. त्साई इंग-वेन यांनी नॅन्सी पलोसी यांचे आभार मानताना तैवानच्या स्वयंसुरक्षेला पाठिंबा दिल्याचा उल्लेख केला.

नक्की वाचा >> जगासमोर नवी युद्धचिंता ; चीनचा विरोध धुडकावून अमेरिकेच्या नॅन्सी पलोसी तैवान दौऱ्यावर

“अमेरिकेसाठी तैवान हा सर्वात विश्वासार्ह आणि विश्वास ठेवता येईल असा देश आहे. आम्ही अमेरिकेसोबत यापुढेही काम करत राहू. इंडो-पॅसिफिक प्रदेशातील शांतता आणि स्थैर्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याप्रमाणे या प्रदेशातील आर्थिक भरभराट, कौशल्या विकास, पुरवठा आणि मागणी यासारख्या गोष्टींवर भर देऊन तैवान-अमेरिका संबंध सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असंही त्साई इंग-वेन म्हणाल्या.

नक्की वाचा >> अमेरिकेला तैवानमध्ये ‘संधी’ मिळेल?

मंगळवारी रात्री तैपईच्या विमानतळावर पलोसी उतरल्यानंतर चीनने आगपाखड करण्यास सुरुवात केली असून तैवानवर हल्ला करण्याची धमकी दिली. आधीच युक्रेन आणि रशियात सुरू असलेल्या संघर्षांमुळे जग पोळले असताना चीन आणि अमेरिकेत वाढता तणाव आशिया खंडासाठी नवी युद्धचिंता घेऊन आला आहे.