scorecardresearch

Ukraine War: आता NATO वरच युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांनी साधला निशाणा; म्हणाले “यापुढे जे मृत्यू होतील त्यासाठी…”

विशेष म्हणजे याच नाटोमध्ये युक्रेनला प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर रशियाने आक्षेप घेतला होता, तर युक्रेनने या देशांसोबत जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले.

Volodymyr Zelenskyy criticised NATO
(फाइल फोटो)

युक्रेनच्या हवाई क्षेत्राला निषिद्ध क्षेत्र (नो फ्लाय झोन) जाहीर करण्यास किंवा त्यावर देखरेख ठेवण्यास ‘नाटो’ने शुक्रवारी नकार दिला. याच मुद्द्यावरुन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी एका भवनिक भाषणामध्ये नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेनवर (नाटो) कठोर शब्दात टिका केलीय. नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने झेलेन्स्की यांनी संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे याच नाटोमध्ये युक्रेनला प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर रशियाने आक्षेप घेतला होता, तर युक्रेनने या देशांसोबत जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केलेत. मात्र आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नाटोलाच लक्ष्य केलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित न केल्याने रशियाला फायदा होणार आहे असा दावा झेलेन्स्की यांनी केलाय. त्याचप्रमाणे नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने युक्रेनवर रशियाकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांमध्ये वाढ होईल अशी भीतीही झेलेन्स्कींनी व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> Ukraine War: “मोदींचा एकमेव मंत्र म्हणजे NATO… नो अ‍ॅक्शन तमाशा ओन्ली”

युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?
“आजपासून यापुढे ज्या लोकांचा मृत्यू होईल त्याला कुठेतरी तुम्ही सुद्धा जबाबदार असाल. तुमच्या नेतृत्वामुळे, तुमच्यामध्ये निर्णय घेण्याइतकी एकता नसल्यामुळे या मृत्यूंसाठी तुम्हालाच जबाबदार धरावं लागेल,” असं झेलेन्स्की म्हणालेत. शुक्रवारी रात्री उशिरा देशाला संबोधित करताना केलेल्या भाषणात झेलेन्स्कींनी हा मुद्दा मांडला. “युक्रेनमधील शहरांवर आणि गावांना नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार देत या संघटनेनं बॉम्बहल्ले करण्यासाठी हिरवा कंदील दाखवलाय,” अशी टीका झेलेन्स्कींनी केली.

नक्की वाचा >> Ukraine War: “माझ्यासोबत बसा, आपण अगदी…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना सुचवला ‘युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग’

नाटोने काय कारण दिलं?
युक्रेनला नो फ्लाय झोन तसे केल्यास त्याची परिणती युरोपात अण्वस्त्रसज्ज रशियाशी युद्ध भडकण्यात होऊ शकते, असा इशारा ‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी शुक्रवारी दिला. ते म्हणाले की आम्ही युक्रेनमध्ये प्रवेश करणार नाही, ना जमिनीवर ना हवाई क्षेत्रात. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी हवाई वाहतूक निषिद्ध क्षेत्र जाहीर करण्याचे आवाहन पाश्चिमात्य देशांना केले होते.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांच्यासोबतच्या ९० मिनिटांच्या कॉलनंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा धोक्याचा इशारा; म्हणाले, “भविष्यात युक्रेनसाठी…”

क्लस्टर बॉम्बचा वापर…
रशिया युक्रेनवर ‘क्लस्टर बॉम्ब’चा मारा करीत असल्याचा आरोप नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केला. रशिया क्लस्टर बॉम्बचा वापर करीत असल्याचे आम्ही पाहिले आहे. रशियाच्या या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत आहे, असे स्टॉल्टनबर्ग यांनी ब्रसेल्समध्ये पत्रकारांना सांगितले.

नक्की वाचा >> Ukraine War: “भारताने काय करावं हे त्यांना सांगण्याची…”; UN मधील भारताच्या भूमिकेवरुन फ्रान्सचे खडे बोल

शुक्रवारी नेमकं काय काय घडलं?
दक्षिण युक्रेनमध्ये युद्धाची तीव्रता वाढली आहे. येथील मारियुपॉल, चेर्निहाइव्ह आणि खार्किव्ह येथे गोळीबार, क्षेपणास्त्र मारा सातत्याने सुरु आहे. खेर्सन शहरावर रशियाने ताबा मिळवला आहे. तर दुसरीकडे अझोव्ह समुद्रावरील मोक्याच्या बंदराच्या सीमेवर असणाऱ्या मारियुपोल शहरामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. काळ्या समुद्राच्या बंदरातील स्थानिक सरकारी मुख्यालय रशियाने ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला युक्रेनियन अधिकाऱ्यांचा दुजोरा दिलाय. आठवड्याभरात युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिकांचे शेजारी देशांमध्ये स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: President volodymyr zelenskyy criticised nato for refusing no fly zone over ukraine scsg