पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘राष्ट्रपती पदाची निवडणूक ही दोन व्यक्तींमध्ये नसून, दोन विचारधारांमधील लढाई आहे,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांनी केले. १८ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी राहुल गांधी बोलत होते.

यशवंत सिन्हा यांनी सोमवारी राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी आदी नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन नेत्यांत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होईल. १८ जुलैला मतदान झाल्यानंतर मतमोजणी २१ जुलैला होणार आहे. २४ जुलैला विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आहे.

तृणमूल काँग्रेसच्या सौगत राय यांनी सांगितले, की ही जातीयवाद-धर्माधता विरुद्ध धर्मनिरपेक्षतेची लढाई आहे. यशवंत सिन्हा हे राष्ट्रपती पदासाठी योग्य उमेदवार आहेत. काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह राष्ट्रीय जनता दल, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आदींसह अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा सिन्हा यांना लाभला आहे. ही सर्वोत्तम मूल्ये मानणारी सर्वसमावेशक आघाडी आहे. येचुरी यांनी सांगितले, की हा अस्मितेच्या राजकारणाचा प्रश्न नाही. आम्ही द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानतो, पण ही विचारधारेची लढाई असणार आहे.

‘संघाची द्वेषमूलक विचारधारा विरुद्ध बंधुभाव’

यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले, की एका बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची द्वेषमूलक विचारधारा आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांची बंधुभावाची विचारधारा आहे. आमचे समर्थन यशवंत सिन्हांना आहे. जरी आम्ही एका व्यक्तीला पाठिंबा देत असलो, तरी आमचा संघर्ष विचारांचा आहे. सर्व विरोधी पक्ष सिन्हा यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत.