Presidential Poll Updates, 18 July 2022: देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होणार आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होईल. द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली आहे. देशाच्या दुसऱ्या महिला आणि आदिवासी समाजाच्या पहिल्या नेत्या येत्या २५ जुलै रोजी सर्वोच्च पदावर विराजमान होतील असा विश्वास सत्ताधारी पक्षाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ४८०९ लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असेल. लोकसभेचे ५४३ खासदार, राज्यसभेचे २३३ खासदार आणि ४०३३ विविध राज्यांमधील आमदारांमधून नव्या राष्ट्रपतींची निवड होईल. एकूण ४८०९ लोकप्रतिनिधींचे मतांचे मूल्य हे १० लाख, ८६ हजार, ४३१ एवढे आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील ७७६ खासदारांच्या प्रत्येक मताचे मूल्य हे ७०० एवढे असेल. खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २०० आहे. विविध राज्यांमधील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २३१ एवढे आहे.