देशाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक सोमवारी पार पडली. या निवडणुकीत ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत पहायला मिळत असून दोन्ही बाजूकडून आपआपल्या उमेदवारांसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जोर लावल्याचं पहायला मिळालं. या निवडणुकीमध्ये प्रत्येक मत महत्वाचं असल्याने काही लोकप्रिनिधींसाठी विशेष सवलतीअंतर्गत मतदान करण्याची मूभा देण्यात आली.

या निवडणुकीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मात्र देशाच्या अर्थमंत्री पीपीई कीटमध्ये मतदान करण्यासाठी आल्याचं पहायला मिळालं. निर्मला यांच्याप्रमाणेच केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनीही पीपीई कीट परिधान करुनच मतदान केलं. दोन्ही नेते पीपीई कीट परिधान करुन मतदान करतानाचे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांना करोनाचा संसर्ग झाला असल्याने त्यांना पीपीई कीट परिधान करुन मतदान करण्याची मूभा देण्यात आली होती. त्यानुसार हे नेते सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास मतदानासाठी मतदान केंद्रावर पीपीई कीटमध्ये पोहोचल्याचं दिसून आलं.

सकाळी १० वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तासाभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मतदानाचा हक्क बजावला. मनमोहन सिंग हे व्हीलचेअरवर मतदान केंद्रामध्ये आले होते. मनमोहन सिंग हे ८९ वर्षांचे असून ते पहिल्यांदाच व्हीलचेअरवरुन संसदेमध्ये आल्याचं पहायला मिळालं. आरोग्यासंदर्भातील तक्रारींमुळे मनमोहन सिंग यांनी हिवाळी अधिवेशनाआधी सुट्टी घेतली होती.

१० राज्यांमध्ये १०० टक्के मतदान
राष्ट्रपतीपदासाठी देशभरातील राज्यांच्या विधानसभांमध्येही मतदान पार पडले. छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आणि तामिळनाडू या दहा राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले.

…म्हणून महाराष्ट्रात १०० टक्के मतदान नाही
महाराष्ट्रात विधानभवन येथे झालेल्या मतदान प्रक्रियेत २८७ पैकी २८३ आमदारांनी मतदान केले. आजारी असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना आमदार महेंद्र दळवी, तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान केले नाही. राज्यात विधानसभेच्या २८८ जागा असल्या तरी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त झाल्याने सध्याचे संख्याबळ २८७ आहे.