उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात पक्षाच्या नऊ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. उत्तराखंडच्या राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी रावत यांना राज्यपालांनी २८ मार्चपर्यंतची मुदत दिली होती. ती संपण्याआधीच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड विधानसभा पुढील आदेशापर्यंत निलंबीत राहणार आहे. या आदेशामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी धडपड करणाऱया हरीश रावत यांच्या सर्व हालचाली आता फोल ठरल्या आहेत.
दरम्यान, हरीश रावत यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्यावरील घोडेबाजाराचे सर्व आरोप फेटाळले आहेत. याशिवाय, सत्तेसाठी केंद्रातील भाजप सरकार राज्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.