उत्तर प्रदेशात करनी सेनेच्या कृत्यामुळे वाद 

करनी सेनेच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात घुसून नोंदणी पद्धतीने होणारा आंतरधर्मीय विवाह रोखल्याने वाद निर्माण झाला आहे.  करनी सेनेने गुरुवारी या संदर्भातील एक ध्वनीचित्रफित प्रसारित केली आहे. त्या चित्रफितीत १८ वर्षांची एक तरुणी, ‘‘मी स्वेच्छेने मुस्लीम तरुणाशी निकाह लावत आहे’’, असे म्हणत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते. तथापि, तिच्या वडिलांनी मात्र तिचा प्रियकर दिलशादविरुद्ध तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षकांनी करनी सेनेचा ‘लव्ह जिहाद’ चा दावा फेटाळला. शिवाय, करनी सेनेने न्यायालयात गोंधळ घालून जबरदस्तीने विवाह रोखल्याच्या प्रकाराचाही इन्कार केला. न्यायालयापुढे तरुणीचे जाबजबाब नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

संबंधित दलित तरुणी आणि तिचा प्रियकर दिलशाद न्यायालयात पोहोचले. तरुणीने बुरखा परिधान केला होता. तेथे करनी सेनेचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घातला. त्याचबरोबर तरुणी अल्पवयीन असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांनी त्या दोघांनाही जबरदस्तीने उभाव पोलीस ठाण्यात नेले. चित्रफितीत करनी सेनेचे कार्यकर्ते दिलशादला धमकावत असल्याचे स्पष्ट दिसते.