अवघे ४१ दिवस वय असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. किमती नियंत्रणाखाली असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली. मात्र सध्या महागाईची जी काही स्थिती आहे त्यास मागील यूपीए सरकारच जबाबदार असल्याचा टोलाही अर्थमंत्र्यांनी लगावला.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत विरोधकांनी महागाईबद्दल सरकारला धारेवर धरले. महागाईवरील ऐन वेळी उपस्थित झालेल्या चर्चेत अन्यधान्य, कांदे-बटाटे, डिझेल, रेल्वेभाडे आदींचे भाव वाढल्याबद्दल काँग्रेससह सपा, बसपा, तृणमूल काँग्रेस आदींनी सरकारवर हल्ला चढवला.
मात्र अर्थमंत्री जेटली यांनी या हल्ल्यास तोंड देताना या गोष्टींना मागील यूपीए सरकारच जबाबदार असल्याचे प्रत्युत्तर दिले. मात्र आपल्या सरकारने भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. यूपीए सरकार भाववाढ झाल्यानंतर जागे होत असे. परिणामी कांद्याचे भाव १०० रुपये किलोपर्यंत गेले होते. आमच्या सरकारने मात्र सत्तेत येताच प्रतिबंधात्मक उपाय योजले आणि कांद्याचे भाव २५ रुपयांवरच रोखण्यात यश मिळवले, असे स्पष्टीकरण जेटली यांनी दिले.
रेल्वेच्या प्रवासी आणि मालवाहतूक भाडय़ातील वाढ वास्तविक यूपीएनेच फेब्रुवारी महिन्यात केली होती. निवडणुकीमुळे सरकारने ती लागू केली नव्हती. आम्हाला ती वारसा स्वरूपात मिळाली, असा युक्तिवाद त्यांनी केला.