scorecardresearch

सोन्याच्या दराची विक्रमी गुढी;जागतिक तेजीने तोळय़ाचा भाव ६० हजारांच्या घरात

ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. सोन्याच्या भावात सोमवारी प्रतितोळा १ हजार ४०० रुपयांची वाढ होऊन तो ६० हजार १०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे.

Gold Silver Price
आजचे सोन्या-चांदीचे दर (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली

ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. सोन्याच्या भावात सोमवारी प्रतितोळा १ हजार ४०० रुपयांची वाढ होऊन तो ६० हजार १०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. जागतिक पातळीवर झालेल्या भाववाढीचा परिणाम भारतीय बाजारांमध्ये बघायला मिळत आहे.
सोन्याचा भाव याआधी बाजार चालू असलेल्या दिवशी ५८ हजार ७०० रुपये होता. आता राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावाने आतापर्यंतची विक्रमी कामगिरी केली आहे. चांदीच्या दरानेही सोमवारी मोठी उसळी घेत प्रतिकिलो १ हजार ८६० रुपयांची वाढ नोंदविली. त्यामुळे चांदीचा दरही ६९ हजार ३४० रुपयांवर पोहोचला आहे. याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजमधील वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, की दिल्लीतील बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमसाठी ६० हजार १०० रुपयांवर गेला. त्यात सुमारे १ हजार ४०० रुपयांची वाढ दिसून आली.

जागतिक पातळीवर सोने आणि चांदीचा भाव वधारला आहे. जागतिक पातळीवर सोन्याचा भाव प्रतिऔंस २ हजार ५ डॉलर आणि चांदीचा भाव प्रतिऔंस २२.५५ डॉलर होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्र्हिसेसच्या कमोडिटी संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले की, बँकिंग संकटामुळे जगभरातील भांडवली बाजारांना धक्का बसला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे ओढा वाढला आहे. याचाच परिणाम होऊन सोन्याची वाटचाल मागील तीन वर्षांतील सर्वात मोठी भाववाढ नोंदवण्याच्या दिशेने सुरू आहे.

जागतिक पातळीवरील बँकिंग संकटाचा परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे. अमेरिकेतील दोन बँका बुडाल्या आणि क्रेडिट सुईस आर्थिक संकटात सापडल्याने सोन्याच्या भावात तेजी दिसून येत आहे. ही तेजी आगामी काळात अशीच राहण्याची शक्यता आहे. – शैलेश रांका, मालक, रांका ज्वेलर्स

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 03:36 IST

संबंधित बातम्या